भायखळा येथील शासनाच्या जे.जे. रुग्णालय व ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात शिस्त निर्माण करून जास्तीत जास्त रुग्णांना सेवा मिळवून देणारे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांची वैद्यकीय शिक्षण संचालनालयात हंगामी सहसंचालक अशी तात्पुरती ‘पदोन्नती’ देऊन बदली करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने केलेल्या या हंगामी पदोन्नतीच्या ‘विनोदा’चे तीव्र पडसाद वैद्यकीय वर्तुळात उमटले असून ही हंगामी पदोन्नती नाकारण्याचा निर्णय डॉ. लहाने यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून काम करत असतानाच वैद्यकीय शिक्षण संचालनालयात सहसंचालकाचा हंगामी कार्यभार डॉ. लहाने हे पाहत होते. तथापि त्यांना जे.जे. मधून हलविण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने घेतल्यामुळे गेल्या आठवडय़ातच त्यांच्या हंगामी पदोन्नतीची फाईल तयार करण्यात आली होती. मात्र नियमानुसार यासाठी हंगामी पदोन्नती समितीची बैठक झाली नसल्यामुळे अडचण निर्माण होऊ शकते हे लक्षात घेऊन अशी बैठक घेण्यात आली आणि बुधवारी ८ जून रोजी त्यांच्या हंगामी पदोन्नीतवर बदलीचे आदेश जारी करण्यात आले. डॉ. लहाने यांच्या बदलीच्या आदेशात सदर पद हे तात्पुरत्या स्वरूपात केवळ ३६० दिवसांसाठी भरण्यात येत असल्याचे म्हटले आहे. तसेच सहसंचालक म्हणून काम समाधानकारक नसल्यास पदावनती करण्यात येईल आणि ही हंगामी पदोन्नती सेवाज्येष्ठतेमध्ये धरता येणार नाही, असे नमूद केले आहे. वस्तुत: या पदाचे काम बऱ्याच काळापासून डॉ. लहाने पाहत असताना त्यांना जे.जे. रुग्णालयातून हलवायचे असल्यास किमान पूर्णवेळ पदोन्नती तरी द्यायला हवी होती, असे मत जे.जे.मधील काही अध्यापकांनी व्यक्त केले. डॉ. लहाने यांना जे.जे.मधून बाहेर काढल्यास येथील नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या कामावर मोठा परिणाम होऊ शकतो. अलीकडेच निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने डॉ. लहाने यांच्या बदलीच्या मागणीसाठी संप पुकारला होता. तथापि न्यायालयाने ‘मार्ड’च्या संपावर बंदी लागू केल्यामुळे डॉ. लहाने यांच्या बदलीचा घाट त्यावेळी घालता आला नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
वर्षभरापासून प्रयत्न?
गेल्या वर्षभरापासून वैद्यकीय शिक्षण मंत्रालयातून डॉ. लहाने यांना जे.जे.मधून हलविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे जे.जे.मधील ज्येष्ठ अध्यापकांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. जे.जे.मध्ये त्यांनी आणलेली शिस्त आणि ८५० कोटी रुपयांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे काम मंत्रालयातील काहींच्या डोळ्यात खुपल्यामुळेच त्यांना पदोन्नती देऊन हलविण्यात आल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा