मुंबई : शस्त्रक्रियेच्या आकडय़ांसाठी नव्हे, तर रुग्णसेवेसाठी काम करतो. पण, आमच्यावर झालेल्या आरोपांमुळे मन उद्विग्न झाले. त्यामुळे यापुढे जे. जे. रुग्णालयात जाऊन काम करणार नाही. जे. जे. रुग्णालय आणि आमचा संबंध संपला, असे नेत्रशल्य चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. मात्र, माझ्या नावामुळे जे रुग्ण जे. जे. रुग्णालयात येत होते, त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्यावर माझ्या ‘रघुनाथ नेत्रालय’मध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जे. जे. रुग्णालयाच्या नेत्रशल्य चिकित्सा विभागामध्ये १९९५ पूर्वी रोज ३० रुग्ण येत होते. तर, वर्षांला ६०० शस्त्रक्रिया होत होत्या. मात्र, मी पदभार स्वीकारल्यानंतर आणलेले आधुनिक तंत्रज्ञान आणि शिबिरांमुळे रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली. आजघडीला या रुग्णालयाच्या नेत्रशल्य चिकित्सा विभागामध्ये दररोज ३०० ते ४०० रुग्ण येतात आणि वर्षांला साधारणपणे साडेतीन ते चार हजार शस्त्रक्रिया होतात. गेल्या १० वर्षांमध्ये आम्ही एक लाख ५६ हजार मोफत शस्त्रक्रिया केल्या. यामध्ये रेटिनाच्या २३ हजार ८७९, कॉर्नियाच्या सहा हजार ५००, ओपोलोप्लास्टी १४ हजार २६ आणि अन्य आठ हजार ५०० शस्त्रक्रियांचा समावेश आहे. असे असताना निवासी डॉक्टरांचे रुग्ण मी चोरतो, या जे. जे. रुग्णालयामधील निवासी डॉक्टरांकडून करण्यात आलेल्या आरोपांमुळे मन उद्विग्न झाले. त्यामुळे यापुढे मी आणि माझ्यासोबत असलेले आठ डॉक्टर जे. जे. रुग्णालयात जाऊन काम करणार नाही. आम्हाला पुन्हा बोलावले तरी आम्ही जाणार नाही. मात्र आमच्यासाठी येणाऱ्या रुग्णांवर राज्यातील कोणत्याही रुग्णालयामध्ये जाऊन शस्त्रक्रिया करू. तसेच माझ्या रघुनाथ नेत्रालयामध्ये मोफत उपचार करू, असेही त्यांनी जाहीर केले.
आमच्यावर आरोप करणाऱ्या निवासी डॉक्टरांना आम्ही माफ केले आहे. त्यांना आमची गरज लागल्यास आम्ही नक्कीच मदत करू. जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांनी चांगले शिक्षक आणून त्यांना शिकवावे. त्यांना आमच्या शुभेच्छा, असे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.
आमच्याकडे गरीब रुग्ण येतात. या गरीब रुग्णांना आंधळे करणे आम्हाला जमणारे नाही. निवासी डॉक्टरांच्या आरोपांवर अधिष्ठात्यांनी आमची बाजू ऐकून घेतली नाही. निवासी डॉक्टरांना रुग्ण तपासणे आणि त्यांचा इतिहास जाणून घेण्यास सांगितले जात होते, असेही ते म्हणाले.
(डॉ. तात्याराव लहाने)