मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयातल्या ९ डॉक्टरांनी बुधवारी अचानक तडकाफडकी राजीनामे दिल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. राजीनामा दिलेल्या डॉक्टरामध्ये मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्रचे समन्वयक डॉ. तात्याराव लहाने यांचाही समावेश आहे. यामुळे मुंबईच्या वैद्यकीय क्षेत्रात या प्रकाराची मोठी चर्चा सुरू झाली असून जे. जे. रुग्णालयातील प्रशासन आणि डॉक्टरांमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. यासंदर्भात डॉ. तात्याराव लहाने यांनी टीव्ही ९ शी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, राजीनामा देण्यामागचं खरं कारण सांगतानाच घटनाक्रमही सांगितला. त्याचवेळी जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टर आपल्या मागण्यांसाठी संपावर गेल्याचंही दिसून येत आहे.

“बाजू मांडण्याची संधीच दिली नाही”

“आमच्याकडे सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या निवासी डॉक्टरांनी २२ तारखेला त्यांना शस्त्रक्रिया करायला दिल्या जात नाहीत म्हणून अधिष्ठातांकडे तक्रार केली. पण आमच्याकडे तीन वर्षं शिकलेल्या डॉक्टरांनी लिहून दिलेलं आहे की त्यांना सर्व काही शिकवलेलं आहे. आम्ही गेली ३० वर्षं काम करत आहोत. त्यामुळे ३ वर्षं किंवा ३० वर्षं काम करणाऱ्या लोकांवर विश्वास न ठेवता सहा महिन्यांपूर्वी आलेल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवून अधिष्ठात्यांनी त्यांची चौकशी केली. आम्हाला चौकशीसाठी न बोलवताच एकतर्फी रिपोर्ट पाठवला”, असं तात्याराव लहाने म्हणाले.

जे. जे. रुग्णालयात राजीनामासत्र; ‘मार्ड’च्या आरोपांनंतर डॉ. लहाने, डॉ. पारेख यांच्यासह इतर आठ डॉक्टरांचा पदत्याग

“वर्षभर माझा पगार दिलेला नाही”

“गेल्या वर्षभरात माझा पगार काढला नाही. मला क्वॉर्टर्ससाठी ७ लाख रुपये दंड लावला. तरीही आम्ही निमूटपणे गरिबांची सेवा करत होतो. पण यांचा त्रास रोजच वाढत चालल्याामुळे आम्ही ठरवलं की आता यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. रागिणीची ८ वर्षं सेवा बाकी आहे. पण एवढा त्रास का सहन करायचा? म्हणून तिनेही व्हीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. या मुलांना समजावून सांगणं गरजेचं होतं. पण तसं न करता प्रशासनाने आमच्या विरोधात भूमिका घेतली”, असंही डॉ. लहाने म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“फक्त सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या डॉक्टरांचं म्हणणं ऐकून घेतलं जात असेल तर…”

“३० वर्षं काम केल्यानंतर आम्हाला चौकशीलाही न बोलवता चार तासांत एकतर्फी अहवाल पाठवला. आमच्या बदल्या करण्याची, कारवाई करण्याची मागणी केली. नवीन अधिष्ठाता रुजू झाल्यापासून आम्हाला कोणतीही मदत झाली नाही. रुग्णसेवेत नेहमी अडथळेच येत गेले. सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या डॉक्टरांचं म्हणणं ऐकून घेतलं जात असेल, तर आम्ही निर्णय घेतला की यानंतर या विभागात काम करायचं नही”, असंही तात्याराव लहाने यांनी सांगितलं.