मराठी साहित्यक्षेत्रात मानाचा समजला जाणारा यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक व कथाकार डॉ. विजया राजाध्यक्ष यांना जाहीर झाला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे हे १४ वे वर्ष आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी गुरूवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत यासंबंधीची घोषणा केली. एक लाख रूपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते. येत्या २७ फेब्रुवारीस नाशिकच्या कालिदास मंदिरात डॉ. विजया राजाध्यक्ष यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पुरस्कार्थीची निवड करण्यासाठी सतीश तांबे, कवी दासू वैद्य, रेखा इनामदार साने, मोनिका गजेंद्र गडकर, अनुपमा उजगरे यांच्या परीक्षक समितीने काम पाहिले. आजवर प्रसिद्ध व ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर (१९९१), विंदा करंदीकर (१९९३), इंदिरा संत (१९९५), गंगाधर गाडगीळ (१९९७), व्यंकटेश माडगुळकर (१९९९), ना. पेंडसे (२००१), मंगेश पाडगावकर (२००३), नारायण सुर्वे (२००५), बाबुराव बागुल (२००७), ना. धो. मनोहर (२००९), महेश एलकुंचवार (२०११), भालचंद्र नेमाडे (२०१३), अरुण साधू (२०१५) यांना जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कथाकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या विजया राजाध्यक्ष यांनी मानिनी सदरातून ललित लेखनाला सुरवात केली. त्याचे नाव होते नित्य नवा दिस जागृतीचा. सहा दशकं अविरतपणे लेखन करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक विजया राज्याध्यक्ष यांची प्रामुख्याने ओळख आहे ती कथालेखिका आणि समीक्षक म्हणून. १९६५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘अधांतर’ या पहिल्या कथासंग्रहानंतर त्यांचे तब्बल १९ कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. मराठी साहित्यक्षेत्रात त्यांचे ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’ , ‘बहुपेडी विंदा (चरित्र-आत्मचरित्र समीक्षा)’, ‘आहे मनोहर तरी … वाचन आणि विवेचन’ हे समीक्षापर लेखन प्रसिद्ध आहे. याशिवाय ‘अन्वयार्थ’, ‘दोनच रंग’ , ‘अनोळखी’ , ‘जास्वंद’ , ‘चैतन्याचे ऊन’ , ‘समांतर कथा’ हे कथासंग्रहही आहेत.