मुंबई – पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून दरवर्षी मुंबईत केल्या जाणाऱ्या नालेसफाईला यंदा सुरूवात झाली आहे. मोठे नाले, लहान नाले, भूमिगत गटारे यांच्यातील गाळ काढण्यासाठी कार्यादेश देण्यात आला असून आतापर्यंत एकूण १५ टक्के गाळ काढण्यात आला आहे. यावर्षी एकूण १० लाख २१ हजार ७८१.९२ मे.टन गाळ काढण्याचे लक्ष्य आहे. या कामासाठी ३१ कंत्राटदार निश्चित करण्यात आले असून २४९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबू नये म्हणून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी व नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे केली जातात. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ७५ टक्के गाळ हा पावसाळ्यापूर्वी काढला जातो, तर १५ टक्के गाळ पावसाळ्यादरम्यान आणि १० टक्के पावसाळ्यानंतर काढला जातो. ही कामे दरवर्षी मार्च महिन्यात सुरू होतात. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून नालेसफाईच्या कामांना मुंबईत सुरूवात झाली आहे. आतापर्यंत १५ टक्के गाळ काढण्यात आला आहे. यंदा प्रशासकीय राजवट असून सध्या आचारसंहिता लागलेली आहे. मात्र नालेसफाईच्या कामांची निविदा प्रक्रिया आधीच पूर्ण झाली असून कार्यादेशही देण्यात आले आहेत. मिठी नदीतील गाळ काढण्याचे दोन वर्षांचे कंत्राट गेल्यावर्षीच देण्यात आले आहे.
मोठ्या नाल्यांतून जवळपास सव्वा पाच लाख मेट्रीक टन गाळ काढणे अपेक्षित आहे. लहान नाल्यांतून साडेचार लाख मेट्रीक टन गाळ काढण्यात येणार आहे. मिठी नदी व लहान, मोठे नाले यातून वर्षभरात एकूण १३ लाख मेट्रीक टन गाळ काढणे अपेक्षित आहे. त्यापैकी ७५ टक्के म्हणजे १० लाख मेट्रीक टन गाळ ३१ मे पूर्वी काढला जाणार आहे. त्यासाठी सध्या दोन पाळ्यांमध्ये कामे सुरू झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मोठ्या नाल्यांचे काम हे तीन पाळ्यांमध्ये सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. उपनगरांमध्ये मोठे नाले हे बंदिस्त नाहीत त्यामुळे इथे नालेसफाईची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र शहर भागात नाले बंदिस्त असल्यामुळे इथे कामांवर थोडी मर्यादा येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यंदा अचानक पाहणी
नालेसफाई आणि त्यासाठी केला जाणारा खर्च यावरून नेहमीच पालिकेवर टीका होत असते. नालेसफाई झालीच नसल्याचा दावा विरोधक करत असतात. त्यामुळे नालेसफाई ही पालिका प्रशासनाची खरी कसोटी असते. त्यातच यावेळी प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे प्रशासनाने खूप खबरदारी घेतली असून नालेसफाईच्या कामांवर तंत्रज्ञानाद्वारे नजर ठेवली जाणार आहेच. पण या कामांची अचानक पाहणी करण्यात येणार असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा – आमचा प्रश्न – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न टांगणीला
मुंबईतील मोठे नाले, लहान नाले तसेच मिठी नदी यांची एकूण लांबी सुमारे ६८९ किमी आहे. मुंबई व उपनगरात ३०९ मोठे नाले, १५०८ लहान नाले, रस्त्याच्या कडेला असलेली २००० किमी लांबीची गटारे, पाच नद्या यातून हे पावसाचे पाणी वाहत असते.