भ्रष्टाचाराचे कुरण मानल्या जाणाऱ्या म्हाडामध्ये नियुक्ती झाली की, खुर्चीला चिकटून बसणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना खुर्ची सोडवत नाही. म्हाडाचे नवे सचिव हळबे यांनाही तसाच अनुभव आला. माजी सचिव शिवाजीराव दिवेकर हे देखील कार्यभार सोडायला तयार नव्हते. अखेर हळबे यांना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात दूरध्वनी करावा लागला. त्यानंतरच त्यांना या पदाचा कार्यभार मिळाला. दिवेकर यांच्या बदलीची चर्चा गेले काही महिने सुरू होती. परंतु प्रत्यक्षात त्यांना मुदतवाढ मिळाल्याचीच अधिक चर्चा होती. मात्र नियुक्तीचा आदेश निघाल्यानंतर हळबे तात्काळ कार्यभार स्वीकारण्यासाठी आले. परंतु आपल्याला मुदतवाढ मिळाली आहे, असे दिवेकर यांनी सांगितले. तेव्हा आदेशाची मागणी केली असता ती सादर करण्यात दिवेकर अयशस्वी ठरले. त्यानंतर मात्र त्यांना सचिवपदाचा कार्यभार हळबे यांच्याकडे सुपूर्द करावा लागला.
अनेक महिने रिक्त असलेल्या मुंबई गृहनिर्माण मंडळाच्या मुख्य अधिकारीपदी सुधांशु यांची नियुक्ती झाली तरी मंडळाला नवा अधिकारी आहे किंवा नाही, हेच लोकांना कळेनासे झाले आहे. याचे कारण म्हणजे हे मुख्य अधिकारी बहुतांश वेळा पुनर्विकास कक्षाचे कार्यकारी अभियंता रामा मिटकर यांच्या कार्यालयात अनेकवेळा लोकांना आढळून आले आहेत. लोकांना भेटण्याच्या वेळात हे अधिकारी उपलब्ध होत नसल्यामुळे खूपच गैरसोय होत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.