१ जानेवारी २०२४ पासून २३ नाटकांचे प्रयोग शिवाजी मंदिरात नाट्यगृहात होणार नाहीत
मुंबई : जाचक नियम, अपुऱ्या सोयी – सुविधा, प्रयोगांच्या तारखांबाबत अडवणूक आणि अरेरावीच्या उत्तरांना कंटाळून काही नाट्यनिर्मात्यांनी दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहावर बहिष्कार टाकला आहे. येत्या १ जानेवारी २०२४ पासून तब्बल २३ नाटकांचे प्रयोग श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणार नाहीत, अशी जाहिरातच नाट्यनिर्मात्यांनी प्रसिद्ध केली आहे.
हेही वाचा >>> एक एकरवरील म्हाडा पुनर्विकासात गृहसाठ्याऐवजी अधिमूल्य? अखेर सामान्यांच्या घरांना मुकावे लागणार!
श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाचे (ट्रस्ट) श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह हे मुंबईतील दादरसारख्या मध्यवर्ती भागात आहे. दिग्गज रंगकर्मींचा आणि दर्जेदार कलाकृतींचा सहवास लाभलेले हे नाट्यगृह प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीचे राहिलेले आहे. परंतु गेल्या काही दिवसांत श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहाचे बदलेले नियम व अटी, भाडेवाढ आदी विविध गोष्टींना कंटाळून काही नाट्यनिर्मात्यांनी नाट्यगृहावर बहिष्कार टाकला आहे. श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहाबाहेरील पदपथावर असंख्य फेरीवाले बसलेले असतात. त्यामुळे नाटकाचे नेपथ्य असलेला टेम्पो मागील प्रवेशद्वाराने नाट्यगृहाच्या आवारात येत असताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो, अनेकदा फेरीवाल्यांसोबत वादही होतात. परंतु या प्रकरणामध्ये नाट्यगृह व्यवस्थापन कधीच मध्यस्थी करायला तयार नसते. अनेकदा ध्वनीयंत्रणेतही बिघाड होतो. नाटकाच्या प्रयोगांच्या तारखांचेही व्यवस्थितपणे वाटप होत नाही आणि नाट्यनिर्मात्यांमधील तारखा बदलांनाही विरोध केला जातो. प्रेक्षकांसाठी वाहनतळाची (पार्किंग) अपुरी सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयीस्कर असे उद््वाहन (लिफ्ट) नाही. या सर्व अडचणींवर नाट्यगृह व्यवस्थापन तोडगा काढायला तयार नाही. तसेच इतर सर्व गोष्टींचा वाढलेला खर्च लक्षात घेता नाटकाच्या तिकिटाचा दर ४०० रुपयांवरून ५०० रुपये केल्यास, नाट्यगृह व्यवस्थापन दीडपट भाडेवाढ करून पुन्हा नाट्यनिर्मात्यांनाच तोट्यात आणू पाहते. श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाच्या (ट्रस्ट) कार्यकारिणी सदस्यांपैकी एक असलेले ज्ञानेश महाराव हे वेळोवेळी अरेरावीची उत्तरे देतात, आदी विविध गोष्टींना कंटाळून बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे काही नाट्यनिर्मात्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> धूळमुक्त मुंबईसाठी २५ स्मॉग गन फॉगिंग यंत्र भाड्याने घेणार; मशीन विकत घेण्याचा प्रस्ताव रद्द
‘जर राज्यातील इतर नाट्यगृहांमध्ये ५०० रुपये तिकीट दर असूनही कोणतीही अतिरिक्त भाडेवाढ नाही, मग ‘श्री शिवाजी मंदिर’ नाट्यगृहात ५०० रुपये तिकीट दर आकारल्यास दीडपट भाडेवाढ का? काही कारणास्तव एखाद्या तारखेला संबंधित नाटकाचा प्रयोग होऊ शकला नाही, त्यामुळे नाट्यनिर्मात्यांनी आपापसांत सामंजस्याने चर्चा करून नाटकाच्या प्रयोगाच्या तारखा बदलून घेतल्या, तर अडचण का? नाट्यगृह व्यवस्थापनाकडून तारीख बदलण्यासंदर्भात निर्मात्यांना फोन का केले जातात? त्याचबरोबर नाटकांच्या प्रयोगांच्या तारखांचेही व्यवस्थितपणे वाटप होत नाही. अरेरावीची उत्तरे दिली जातात, या सर्व गोष्टींचा कहर झाल्यामुळे ‘श्री शिवाजी मंदिर’ नाट्यगृहात प्रयोग न करण्याचा निर्णय घेतला आहे’, असे नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांनी स्पष्ट केले.
‘श्री शिवाजी मंदिर’ नाट्यगृहात इतरही नाटकांचे प्रयोग होत आहेत. ज्या नाट्यनिर्मात्यांनी नाट्यगृहावर बहिष्कार टाकून प्रयोग न करण्याचा निर्णय घेतला आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. कोणत्याही निर्मात्याशी माझी चर्चा झाली नाही.
– ज्ञानेश महाराव, कार्यकारिणी सदस्य, श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ’ (ट्रस्ट)
‘श्री शिवाजी मंदिर’ नाट्यगृहात या नाटकांचे प्रयोग होणार नाहीत
‘व्हॅक्युम क्लीनर’, ‘संज्या छाया’, ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’, ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’, ‘काळी राणी’, ‘नियम व अटी लागू!’, ‘खरं खरं सांग !’, ‘चारचौघी’, ‘अ परफेक्ट मर्डर’, ‘सारखं काहीतरी होतंय’, ‘जर तरची गोष्ट’, ‘दादा एक गुड न्यूज आहे’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘सफरचंद’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘मर्डरवाले कुलकर्णी’, ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’, ‘तू’ म्हणशील तसं!, ‘संकर्षण व्हाया स्पृहा’, ‘आपण यांना पाहिलंत का?’, ‘३८ कृष्ण व्हिला’, ‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’, ‘गालिब’ या २३ नाटकांचे प्रयोग १ जानेवारी २०२४ पासून दादर येथील ‘श्री शिवाजी मंदिर’ नाट्यगृहात होणार नाहीत, असे निर्मात्यांनी जाहीर केले आहे.