मजले तोडले जाणार असलेल्या ‘त्या’ सात इमारतींमध्ये एकापेक्षा अधिक फ्लॅट्स असणाऱ्यांचेही प्रमाण मोठे आहे. कुटुंब एकत्रित राहावे या उद्देशाने काहींनी ‘कॅम्पा कोला’मध्ये एकापेक्षा अधिक फ्लॅट्स घेतले. काहींनी व्यवसायही करता यावा या उद्देशाने दोन फ्लॅट्सची खरेदी केली. काहींनी तर सर्व नातेवाईक एकाच ठिकाणी असावेत या उद्देशाने ‘कॅम्पा कोला’च्या विविध इमारतींमध्ये फ्लॅटखरेदी केली. २५ वर्षांपूर्वी सद्हेतूने पाहिलेले हे स्वप्न आता मात्र धुळीस मिळण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळेच पालिकेची फ्लॅट्स जमीनदोस्त करण्याबाबतची नोटीस मिळाल्यानंतरही या रहिवाशांनी फ्लॅट्समध्येच ठाण मांडून राहण्याचा निर्धार केला आहे.
या कंपाऊंडमधील ‘ऑर्किड अपार्टमेंट’मध्ये राहणाऱ्या देवयानीबेन जे. टिबरेवाल यांच्या नावे इमारतीत १२ व्या मजल्यावर १२०२ आणि १२०३ हे दोन फ्लॅट्स आहेत. परंतु, हे दोन्ही फ्लॅट्स सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार इमारतीच्या अनधिकृत मजल्यांवर आहेत. कुटुंबाला एकत्रितपणे राहता यावे यासाठी सुरेश संचेती या व्यावसायिकाने २५ वर्षांपूर्वी याच इमारतीत जोडून असलेले फ्लॅट घेतले. त्यासाठी त्यांनी नऊ लाख रुपये दिले होते. कुटुंबाने दिलेल्या सल्ल्यामुळेच हे जोडलेले फ्लॅट खरेदी केले. परंतु दोन्हींना पालिकेतर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. या फ्लॅटव्यतिरिक्त मुंबईत कुठलाच आसरा वा मालमत्ता नाही. त्यामुळेच पालिकेने अनधिकृत मजले जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरू केली तरी आपण येथून हटणार नसल्याचा निर्धार संचेती यांनी केला आहे.
खमनचंद अग्रवाल यांनीही ‘ऑर्किड अपार्टमेंट’मध्ये दोन फ्लॅट खरेदी करून आयुष्यभराची कमाई त्यात गुंतवली. १५व्या मजल्यावर त्यांनी दोन फ्लॅट घेतले. याच इमारतीच्या ११व्या मजल्यावर ‘नेहा इम्प्लिमेंटस् प्रा. लि.’ या कंपनीच्या नावे दोन फ्लॅट्स आहेत. ‘ईशा एकता हौसिंग सोसायटी’मध्येही कुटुंबाने किंवा नातेवाईकांनी एकत्रितपणे वा एकाच वेळी फ्लॅट्स खरेदी केल्याची प्रकरणे आहेत. त्यामुळे पालिकेच्या नोटिशीमुळे एकाच वेळी या कुटुंबीयांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे, अशी माहिती ‘सेव्ह कॅम्पा कोला’ मोहिमेच्या सदस्य नंदिनी मेहता यांनी दिली. मेहता यांच्या आणि त्यांच्या पतीच्या नावेही ‘मिडटाऊन’ अपार्टमेंटच्या दहाव्या मजल्यावर दोन फ्लॅट्स आहेत.
प्लॅन पाहिले जात नसत..
ज्या काळात हे फ्लॅट खरेदी केले त्या काळात बिल्डरच्या विश्वासार्हतेवर कुणी शंका उपस्थित करीत नसत. तसेच इमारतीचा प्लॅन काय आहे हेही फारसे पाहिले जात नव्हते. त्या वेळच्या परिस्थितीमुळेच कुठलीही शहानिशा न करता दोन्ही फ्लॅट खरेदी केल्याचे संचेती यांनी मान्य केले. आपल्या अनेक नातेवाईकांनीही या इमारतींमध्ये फ्लॅट घेतल्याचे त्यांनी सांगितले.
एकत्रित कुटुंबाचे, व्यवसाय करण्याचे स्वप्न भंगणार!
मजले तोडले जाणार असलेल्या ‘त्या’ सात इमारतींमध्ये एकापेक्षा अधिक फ्लॅट्स असणाऱ्यांचेही प्रमाण मोठे आहे. कुटुंब एकत्रित राहावे या उद्देशाने काहींनी ‘कॅम्पा कोला’मध्ये एकापेक्षा अधिक फ्लॅट्स घेतले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-05-2013 at 04:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dream will break of collective family business