मुंबईः महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई शाखेने धुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर गांजा लागवडीविरोधात मोठी कारवाई केली. डीआरआयच्या अधिकार्यांना महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील खामखेडा आंबे आणि रोहिणी या गावांमध्ये बेकायदेशीर गांजा लागवड केल्याचे आढळले होते. त्या माहितीच्या आधारे पुणे आणि नागपूरमधील प्रादेशिक पथकांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सीमेवरील दुर्गम भागात तपासणी करण्यात आली. यावेळी डीआरआच्या अधिकाऱ्यांनी न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केलेल्या कारवाईत ७ ठिकाणी सुमारे साडे नऊ एकर क्षेत्रावर बेकायदेशीर गांजा लागवड होत असल्याचे आढळून आले. या ठिकाणी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून उत्पादनवाढीवर भर दिला होता. यावरून ही अत्यंत सुनियोजित बेकायदेशीर लागवड असल्याचेही स्पष्ट झाले. याशिवाय, या शेतांमध्ये गोणपाटात सुकवलेला गांजा देखील आढळून आला. त्यानंतर न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचे मोजमाप करण्यात आले आणि जिओ-टॅग केलेले छायाचित्रण केले गेले. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर ते पीक नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लागवडीसाठी अतिक्रमण
डीआरआयने स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सर्व ७ ठिकाणांचे जमीन अभिलेखही तपासले. तपासणीअंती या जमिनी बेकायदेशीरपणे अतिक्रमित करून गांजाच्या लागवडीसाठी वापरण्यात आल्याचेही निष्पन्न झाले. त्यानुसार, अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा कलम ४८ अंतर्गत या बेकायदेशीर लागवडीवरील मालमत्तेवर जप्ती आणि नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात आली. या कारवाईअंतर्गत एकूण ९.४९३ एकर क्षेत्रावर लावण्यात आलेली ९६ हजार ०४९ गांजाची रोपे उपटून नष्ट करण्यात आली. तसेच, शेतात गोणपाटात भरून ठेवलेला ४२० किलो ३९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. प्राथमिक अंदाजानुसार, या कारवाईमुळे सुमारे १० हजार किलो गांजाचे पीक तयार होण्यापूर्वीच नष्ट करण्यात आले.
गंभीर गुन्हा
अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ अंतर्गतअंतर्गत कोणत्याही व्यक्तीला अशा पदार्थांची लागवड करणे, साठा बाळगणे, विक्री करणे, खरेदी करणे किंवा सेवन करणे बेकायदेशीर कृती आहे. या तरतुदींचे उल्लंघन केल्यास कठोर दंड आणि २० वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद कायद्यात आहे. महसूल गुप्तचर संचालनालय सातत्याने अंमली पदार्थांच्या तस्करांविरोधात कठोर कारवाई करीत आहे. यापूर्वीही डीआरआयने बँकॉकहून आलेला गांजा मुंबई विमानतळावरून जप्त केला होता. या कारवाईत आरोपी प्रवशांनाही अटक करण्यात आली होती.