मुंबईः महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई कक्षाने लातूर जिल्ह्यातील रोहिणा गावात एका गुप्त मेफेड्रोन (एमडी) निर्मिती कारखाना उद्धवस्त केला. शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये एमडीची निर्मिती केली जात होती. या कारवाईत साडेअकरा किलो एमडी जप्त करण्यात आले असून जप्त केलेल्या एमडीची किंमत सुमारे १७ कोटी रुपये आहे. याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात एका पोलिसाचाही समावेश आहे. याप्रकरणी डीआरआयचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.

डीआरआयच्या अधिकाऱ्यांना लातूर जिल्ह्यातील रोहिणा गावातील दुर्गम डोंगराळ भागात एमडी बनवण्याचा कारखाना कार्यरत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी डीआरआयचे अधिकारी लक्ष ठेऊन होते. त्यानंतर मंगळवारी एमडी बनवण्याच्या कारखान्यावर डीआरआयने छापा टाकला.

रसायने आणि प्रयोगशाळेची उपकरणे सापडली

छाप्या दरम्यान शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये एमडीची निर्मिती केली जात असल्याचे निष्पन्न झाले. त्या छाप्यात ११ किलो ३६० ग्रॅम मेफेड्रोन (८ किलो ४४० ग्रॅम कोरडे आणि २ किलो ९२१ ग्रॅम द्रव स्वरूपात) जप्त करण्यात आले. तसेच मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि प्रयोगशाळेतील उपकरणेही सापडली. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचा संशय आहे. याबाबत डीआरआयचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.

पोलीसांसह ७ जण अटकेत

या कारवाईत मेफेड्रोन निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यात एका पोलीस शिपायाचाही समावेश आहे. आरोपी शिपाई मिरा भाईंदर येथील नया नगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्यानंतर, जलद कारवाई करत मुंबईतून या टोळीचा वितरक आणि आर्थिक पुरवठादार यांनाही अटक करण्यात आली. आरोपींची कामे वाटून देण्यात आली होती. काही जण निर्मिती तर काही जण वितरण व पैशांचे व्यवहार पाहत होते. आरोपींनी एमडीचे वितरण कोठे केले आहे? तसेच कच्चा माल कोठून मिळला, बनवण्याचे तंत्र कुठून शिकले. याबाबत डीआरआयचे अधिकारी आरोपींची सखोल चौकशी करत आहेत.

१७ कोटींचे अमली पदार्थ जप्त

या कारवाईत डीआरआयने ११ किलो ३६ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केला आहे. काळ्या बाजारात त्याची किंमत १७ कोटी रुपये आहे, तसेच संपूर्ण प्रयोगशाळा आणि कच्चा माल जप्त करण्यात आला. आरोपींविरोधात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून सातही आरोपींना अटक करण्यात आली आहे.