मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) मुंबई विमानतळावर मंगळवारी केलेल्या कारवाईत सुमारे साडेआठ किलो सोने जप्त केले. त्याची किंमत साडेचार कोटी रुपये असून याप्रकरणी दोन प्रवाशांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांने दिली. दुबईतील एका व्यक्तीसाठी तस्करी केल्याचे या दोघांनी चौकशी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई : एसटी बस स्थानकातील हिरकणी कक्ष नव्या रुपात; हिरकणी कक्षाचे पुनर्जीवन करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय

सोन्याच्या तस्करीबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरआयने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सापळा रचला होता. त्यावेळी दुबईहून आलेला संशयीत अब्दुल बासीत याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने कपड्यांमध्ये चार पुड्या लपवल्या होत्या. त्यात ३९०० ग्रॅम सोने सापडले. त्याची किंमत दोन कोटी १५ लाख १३ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर अन्य एक प्रवासी मोहम्मद सलमान याला डीआरआयने ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडील चार पाकिटांमध्ये सोने लपवल्याचे निष्पन्न झाले. तपासणीत सलीमकडे ४३३० ग्रॅम सोने सापडले असून त्याची किंंत दोन कोटी ३९ लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> मुंबईतील गारवा हळूहळू कमी होणार; किमान तापमान १५ ते २० अंशादरम्यान राहणार

दोघांकडून एकूण सुमारे साडेचार कोटींचे सोने जप्त करण्यात आले. दोघेही दिल्लीचे रहिवासी असून चौकशीत दुबईतील एका व्यक्तीसाठी ते तस्करी करीत असल्याचे निष्पन्न झाले. मुख्य आरोपीची ओळख पटली असून आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारे सोन्याची तस्करी केल्याचा संशय आहे. आरोपींना मुंबईतील एका व्यक्तीकडे सोने सुपूर्द करायचे होते. पण त्यापूर्वीच त्यांना अटक झाली. याप्रकरणी डीआरआयचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dri seizes 8 5 kg gold worth rs 4 5 crore at mumbai airport mumbai print news zws