अन्य पर्यायांकडे दुर्लक्ष; नासाडीमुळे मुंबई महापालिका वादाच्या भोवऱ्यात
निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत असताना मुंबई महापालिकेने मात्र देवनार कचराभूमीत लागलेली आग विझविण्यासाठी तब्बल साडेदहा लाख लिटरहून अधिक पिण्याचे पाणी वापरल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईकरांना दरदिवशी होणाऱ्या पाणीपुरवठय़ाच्या तुलनेत हे पाणी अल्प असले तरी दुष्काळाच्या झळांमध्ये होरपळणाऱ्यांसाठी ते जीवदान ठरले असते.
देवनार कचराभूमीत गेल्या शनिवारी पुन्हा भीषण आग लागली. आग विझविण्यासाठी शनिवारी दुपारपासूनच देवनार पशुवधगृहातून टँकर भरून पाणी येत होते. नंतर आरसीएफमधूनही पाण्याचे टॅंकर आणले जात होते. शनिवारपासून सोमवापर्यंत देवनार पशुवधगृहातून ७७, तर आरसीएफमधून २१ टँकर असे एकूण ९८ टँकर भरून पाणी कचराभूमीतील आग विझविण्यासाठी वापरण्यात आले. पालिकेच्या टँकरची १० हजार लिटर, तर अग्निशमन दलाच्या टँकरची १२ हजार लिटर क्षमता आहे. त्यामुळे सरासरी एक टँकरची क्षमता ११ हजार लिटर पाणी असे गृहीत धरले तरी कचराभूमीतील आग विझविण्यासाठी तब्बल १० लाख ७८ हजार लिटर पिण्याचे पाणी वापरल्याचे स्पष्ट होते. आग विझविण्यासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी शुद्धीकरण प्रक्रिया न केलेले पाणी किंवा विहिरीतील पाणी वापरता आले असते, असेही सूत्रांनी सांगितले.
पिण्याचे पाणी आग विझविण्यासाठी वापरल्यामुळे टीकेची झोड उठू नये यासाठी पालिका अधिकाऱ्यांमध्ये चुळबूळ सुरू झाली आहे. कुणी विचारलेच तर आग विझविण्यासाठी पुनर्प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यात आल्याचे उत्तर देऊन सारवासारव करायची असे अधिकाऱ्यांमध्ये ठरल्याचे समजते. परंतु पालिकेच्या केवळ भांडुप संकुलामध्ये पाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांचा हा दावा फोल ठरण्याची चिन्हे आहेत. मात्र या संदर्भात पालिकेचे जलअभियंता अशोककुमार तवाडिया यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
अल्प असले तरी टंचाईग्रस्तांसाठी दिलासादायक
मुंबईकरांना दरदिवशी ३,७५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्या तुलनेत देवनार कचराभूमीत आगीवर फवारण्यात आलेले १०.७८ लाख लिटर पिण्याचे पाणी अल्प आहे. सध्या मुंबईलगतच्या ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली यासह महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे.या पाश्र्वभूमीवर केवळ आग विझविण्यासाठी १०.७८ लाख लिटरहून अधिक पिण्याचे पाणी वापरण्यात आले आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने मुंबईकरांना आग विझविण्यासाठी वापरण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याचे मोल नाही. परंतु ग्रामीण भागातील नागरिकांच्या दृष्टीने ते दिलासादायक असते.