मुंबई: कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री बेस्ट बसने अनेक वाहनांना दिलेल्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला, तर ३६ जण जखमी झाले. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून बसचालक संजय मोरेला अटक केली.
कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयाजवळ सोमवारी रात्री १० च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ही बस कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला जात होती. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर या बसने रस्त्यावरून जाणाऱ्या काही खासगी वाहनांसह रिक्षा आणि अनेक पादचाऱ्यांना धडक दिली. अखेर ही बस एका भिंतीवर आदळली. या अपघातात ३० ते ३२ जण जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ सर्व जखमींना कुर्ला येथील महापालिकेच्या भाभा आणि इतर खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच जखमींपैकी चौघांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
या अपघातानंतर कुर्ला परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन बसचालक संजय मोरे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी रात्री उशिरा त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुर्ला पश्चिम परिसरात रात्रभर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवाय कुर्ला पश्चिम येथील बेस्ट आगारही रात्रीच बंद करण्यात आले.