२०० रुपयांच्या सुलभ हप्त्यावरही उपलब्ध; सुरक्षेचे धिंडवडे
गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरक्षेच्या मुद्दय़ावरून ‘नागरी विमानसेवा महासंचालनालया’ने हवाई ‘ड्रोन’वर प्रतिबंध घातले असले तरी ‘ड्रोन’च्या विक्रीने ऑनलाइन बाजारात भरारी घेतली आहे. विशेष म्हणजे भारतीय बँकांच्या पाठबळीने अवघ्या २०० रुपयांच्या सुलभ हप्त्यावर अशा ड्रोनची विक्री केली जात आहे.
सध्या ऑनलाइन बाजारात विविध आकारांचे आणि वजनांचे ड्रोन उपलब्ध आहेत. यात २५०० रुपयांपासून ते अगदी ३९ हजारांपर्यंत किमतीचे ड्रोन मिळत आहेत. ५० मीटर उंचीपेक्षा वर उडणारे मानवविरहित या ड्रोनवर एचडी कॅमेराही जोडण्यात आले आहेत. काही ड्रोनवर ब्लेडच्या आकाराचे पाते असल्याचे पाहायला मिळत आहे.
यात गंभीर म्हणजे अशा प्रकारचे ड्रोन सुलभ हप्त्यावर उपलब्ध होत असून अनेक नामांकित बँकांचीही या खरेदीसाठी जोड मिळाली आहे. ‘नागरी विमानसेवा महासंचालनालया’ने ऑक्टोबर २०१४ ला ड्रोनच्या उड्डाणासाठी भारतात बंदी घातली. मात्र याबाबत नियम तयार न करण्यात आल्याने ही विक्री सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, ‘अशा प्रकारे ड्रोनची विक्री होत असल्यास त्याला प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहिती घेऊन कारवाई करू,’ अशी ग्वाही पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
ड्रोनचा धोका
* या ड्रोनचा वापर करून स्फोटक पदार्थाच्या साहाय्याने स्फोट घडवला जाऊ शकतो.
* अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचे चित्रीकरण हवेतून केले जाऊ शकते.
* मंदिर, वर्दळीचे रेल्वे स्थानक, जाहीर सभा, शाळा अशा ठिकाणी स्फोट घडवला जाऊ शकतो. याशिवाय सुरक्षा यंत्रणेच्या मुख्यालयावर हल्ला केला जाऊ शकतो.