डिझेल दरवाढीमुळे कंबरडे मोडलेल्या एसटीला उन्हाळी हंगामात दुष्काळी परिस्थिती आणि लग्नमुहूर्त कमी असल्याचा फटका बसला आहे. त्यामुळे या हंगामात तब्बल २२ ते २५ लाख प्रवासी घटण्याची भीती आहे. मात्र दरवाढ झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्न घटणार नसले, तरी प्रवासी टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाला कसब पणाला लावावे लागत आहे.
मोठय़ा प्रमाणावर डिझेल खरेदी करणाऱ्या (बल्क कंझ्युमर्स) एसटीसारख्या सार्वजनिक उपक्रमांना दर महिना-दीड महिन्याला डिझेल दरवाढीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे एसटीचा इंधनावरील खर्च वाढत आहे व काही दिवसांपूर्वी दरवाढही करण्यात आली. एसटीला उत्पन्नाच्या दृष्टीने सुगीचा काळ म्हणजे उन्हाळी सुट्टीचा हंगाम असतो. १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्यांत प्रवाशांची गर्दी असते, पण यंदा दुष्काळाचा फटका एसटीलाही बसला आहे. दुष्काळी भागात आणि विशेषत: मराठवाडय़ात एसटीचे प्रवासी व उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत घटले आहे, तर राहू अस्तामुळे या वेळी लग्नमुहूर्त कमी असून जूनमध्ये फारसे मुहूर्त नाहीत. दुष्काळामुळेही काही प्रमाणात विवाहांची संख्या काही भागांत कमी झाली आहे. याचा एकत्रित परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. एसटीची गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दररोजची प्रवासी संख्या ७४ लाख होती. ती यंदा घटून ७१-७२ लाख झाली. मात्र मे महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवासी वाढले आणि सध्या प्रतिदिन ७७ लाख प्रवासी एसटीने प्रवास करीत आहेत. जूनमध्ये ही संख्या पुन्हा घटून ७२ लाखांपर्यंत घसरण्याची भीती एसटी प्रशासनाला वाटत आहे. उन्हाळी हंगामाची प्रवाशांची प्रतिदिन सरासरी ७५ लाख असून साधारणपणे १२ कोटी रुपये उत्पन्न मिळते. ते मे महिन्यात प्रवासी वाढल्याने १५ ते १८ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. जूनमध्ये प्रवासी घटण्याची शक्यता असल्याने ते १३-१४ कोटी रुपये राहील, असा अंदाज आहे, असे सूत्रांनी सांगितले.
एसटी प्रवाशांचे भारमान म्हणजे प्रति गाडीमागे असलेले प्रवाशांचे प्रमाण मे महिन्यात ६४ टक्क्य़ांपर्यंत वाढले आहे. ते जूनमध्ये पुन्हा कमी होण्याची भीती आहे. दरवाढीमुळे प्रवासी संख्येवर परिणाम होण्याची भीती असताना प्रवासी टिकविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. त्यात दुष्काळ, विवाह मुहूर्त कमी होणे, अशा परिस्थितीला तोंड देण्याचे आव्हान एसटी प्रशासनापुढे आहे.

एसटीला उत्पन्नाच्या दृष्टीने सुगीचा काळ म्हणजे उन्हाळी सुट्टीचा हंगाम असतो. १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्यांत प्रवाशांची गर्दी असते. पण यंदा दुष्काळाचा फटका एसटीलाही बसला आहे. दुष्काळी भागात आणि विशेषत: मराठवाडय़ात एसटीचे प्रवासी व उत्पन्न गेल्यावर्षीच्या तुलनेत घटले आहे. तर राहू अस्तामुळे यावेळी लग्नमुहूर्त कमी असून जूनमध्ये फारसे मुहूर्त नाहीत.