कुलदीप घायवट
मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांनीच अंमलीपदार्थांची तस्कर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कल्याणमधील दुर्गाडी येथे चरसची विक्री करताना ठाणे शहराच्या गुन्हे शाखा आणि अंमलीपदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी ही कारवाई केली. याप्रकरणी कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस हवालदार महेश वसेकर आणि पोलीस शिपाई रवी विशे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रुपये किंमतीचा ९२१ ग्राम चरस जप्त करण्यात आला. तसेच, इतर संशयीत रेल्वे पोलिसांची चौकशी सुरू आहे.
हेही वाचा >>>ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युती करणार? प्रकाश आंबेडकरांचा मोठा खुलासा, म्हणाले “काही घटक…”
सुमारे ८०० ते ९०० ग्राम चरसची तस्करी होण्याची शक्यता असल्याची तक्रार मुंब्रा येथील तीन तक्रारदारांनी अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडे केली होती. त्यानुसार पथकाने विविध ठिकाणी शोधसत्र सुरू केले. मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याजवळील पोलीस हवालदार वसेकर आणि पोलीस शिपाई विशे दोघे वेगवेगळ्या दुचाकीवर आले. या घटनेची माहिती मिळताच पथक तेथे रवाना झाले. अंमलीपदार्थाची तस्कारी करताना या दोघांना पथकातील अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर दोघांची झडती घेतली असता वसेकरकडे दोन लाख किमतीचे ९२१ ग्राम चरस सापडले. त्यानंतर या दोघाविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
हेही वाचा >>>ठाकरे गट-वंचित युतीच्या चर्चेत CM शिंदेंकडून प्रकाश आंबेडकरांची भेट; पहिली प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री म्हणाले…
काही पोलीस अधिकाऱ्यांनी सीएसएमटीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमधील एका प्रवाशाची बॅग तपासणी केली होती. प्रवाशाच्या बॅगमध्ये चरस सापडले होते. संबंधित प्रवाशाविरुद्ध कारवाई करण्याऐवजी या चरसची तस्करी केल्याप्रकरणी या दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या प्रकरणात ११ पोलिसांच्या दोन पथकांनी प्रवाशांच्या सामानाची तपासणी केल्याचे चौकशीत उघड झाले. नियमांचे उल्लंघन करून हे अधिकारी प्रवाशांच्या सामानाची तपासणी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीीस हवालदार आदींचीही चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>मुंबई: धारावी पुनर्विकासासाठी तीन कंपन्या स्पर्धेत
पुढची पिढी उध्वस्त करण्याची कामे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना ठाणे शहरातील पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तसेच, इतके अंमलीपदार्थ आले कुठून याचा दोन्ही रेल्वे पोलीस शोध घेत आहेत. – मनोज पाटील, लोहमार्ग पोलीस उपायुक्त, मध्य रेल्वे
अंमलीपदार्थ विरोधी पथकाने या दोघांना रंगेहात पकडले आहे. दोघावर गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही सुरू आहे. – शिवराज पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे) ठाणे शहर