लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: मुंबईत गेल्या काही वर्षांत फोफावलेल्या नाईट क्लब तसेच कॅफेंमधील बाऊन्सर्स अमली पदार्थांची विक्री करीत असल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी विभागाने अशा नाईट क्लबवर विशेष नजर ठेवली आहे. तसेच, या बाऊन्सर्सना अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळविण्यास सुरुवात केली आहे.

या प्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे, सांताक्रुज, जुहू, लोखंडवाला परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात उशिरापर्यंत चालणारे रेस्टोबार व कॅफे बार यांचा सुळसुळाट झाला आहे. अशा ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांसाठी अमली पदार्थांचे विक्रेते बारबाहेर उभे राहत असत. परंतु अशा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता या विक्रेत्यांनी बाऊन्सर्सचा वापर सुरू केला आहे. याबाबत गोपनीयरीत्या मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी पाळत ठेवली आहे. अद्याप ठोस हाती लागलेले नाही. परंतु या रेस्टोबार वा कॅफेंतून अमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याचा दाट संशय आहे.

हेही वाचा… मुंबई: तडीपार गुंड पोलीस ठाण्यात ब्लेड घेऊन आला आणि…

रेस्टोबार, नाईट क्लब वा कॅफे परिसरात ‘विड’ या अमली पदार्थाचा वावर अधिक आढळून आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. उच्चभ्रूंच्या रेस्टोबारमधील पार्ट्यांतही अमली पदार्थ उपलब्ध असल्याची माहिती मिळत असते. परंतु जोपर्यंत पुरवठादाराचा थांगपत्ता लागत नाही तोपर्यंत कारवाई करता येत नाही, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा… माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात दाखल, उद्धव ठाकरेंकडून प्रकृतीची विचारपूस

विलेपार्ले येथील एका नाईट क्लबमध्ये बाऊन्सर्स अमली पदार्थ पुरवित असल्याची खबर या विभागाला मिळाली होती. त्यांनी साध्या वेशात पाळत ठेवली. परंतु हाती काही लागले नाही. मात्र बाऊन्सर्स अमली पदार्थ पुरवित असल्याची पक्की खबर आमच्याकडे आहे, असेही हा अधिकारी म्हणाला. या प्रकरणी काही बाऊन्सर्सवर पाळत ठेवण्यात आली असून जुहू, सांताक्रुझ परिसरांतील अमली पदार्थांचे विक्रेतेही रडारवर आहेत. प्रत्यक्षात जोपर्यंत अमली पदार्थ सापडत नाही तोपर्यंत कारवाई करता येत नाही, याकडेही या अधिकाऱ्याने लक्ष वेधले. अशा नाईट क्लब वा रेस्टोबारमध्ये जाणाऱ्या ग्राहकांनी याबाबत सतर्क राहण्याचा सल्लाही पोलिसांनी दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drugs are being sold through bouncers mumbai police has kept a special eye on nightclubs mumbai print news dvr