मुंबई शहर आणि उपनगरात करण्यात येणारी अमली पदार्थांची तस्करी आणि त्यांची खरेदी-विक्री करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अमली पदार्थ विरोधी कक्षाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत शुक्रवारी सांताक्रूझ येथे एका संशयीत व्यक्तीला पकडण्यात आले. झडती घेतली असता त्याच्याकडे ३२५ ग्रॅम हेरॉईन सापडले. या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत एक कोटी ३० लाख रुपये असल्याची माहिती कांदिवली युनिटच्या अमली पदार्थ विरोधी कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा >>> आगामी सोडतीतील रांजनोळी येथील घरांची दुरवस्था; दुरुस्तीशिवाय घरांची सोडत काढण्यास गिरणी कामगारांचा विरोध
सांताक्रूझ पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती मार्गाजवळील वाकोला पुलाच्याखाली शुक्रवारी रात्री ९.३० ते रात्री ११.४५ दरम्यान एक २६ वर्षीय व्यक्ती हातात प्लास्टिकची पिशवी घेऊन संशयास्पदरित्या उभा असल्याचे कांदिवली युनिटच्या अमली पदार्थ विरोधी कक्षातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. ही व्यक्ती पोलिसांना पाहून पळून जात होता. मात्र पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २७५ ग्रॅम हेरॉईन आढळून आले. त्याची चौकशी केली असता त्याने आणखी अमली पदार्थ घरी लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरातून ५० ग्रॅम हेरॉईन आणि अमली पदार्थ विक्रीतून जमा केलेली चार लाख ६० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली. कांदिवली युनिटच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने एकूण ३२५ ग्रॅम हेरॉईन जप्त केले. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात एक कोटी ३० लाख ४ हजार रुपये किंमत आहे. अमली पदार्थविरोधी कक्षाने २६ वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून हेरॉइन पुरवठादारांचा शोध घेण्यात येत असल्याचे अमली पदार्थ विरोधी कक्षातील अधिकाऱ्यांनी सांगितले.