मुंबईः दारू पिऊन वाहन चालवताना चालक सापडल्यास आता थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सर्व वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित चालकाचा परवाना रद्द करण्याची व वाहन जप्त करण्याची शिफारस पोलीस करणार आहेत.
मद्यपी चालकांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त(वाहतूक) अनिल कुंभारे यांनी दिली. याशिवाय पोलीस तात्काळ आरटीओ विभागाला संबंधित व्यक्तीचा चालक परवाना रद्द करण्यासाठी तसेच वाहन जप्त करण्यासाठी शिफारस करणार आहे. याबाबत माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, कोणत्याही व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यास त्याला भविष्यात पारपत्र मिळवण्यास, परदेशी प्रवास करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
मद्यपी चालकांवरील कारवाई वाढ
वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे कारवाई करण्यात येत आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात नाकाबंदी, तसेच विशेष मोहिमेच्या माध्यमातून नियमितपणे कारवाईचे आयोजन करण्यात येते. २०२३ मध्ये मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या २५६२ चालकांविरूध्द मो.वा.का. कलम १८५ अन्वये कारवाई करण्यात आली व २०२४ मध्ये तब्बल ९४६२ चालकांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई २०२३ तुलनेने २६९ टक्के अधिक होती. त्याचप्रमाणे जानेवारी ते मार्च २०२४ दरम्यान १३५६ व जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान २२६४ मद्यपी चालकांविरोधात कारवाई करण्यात आली. गेल्यावर्षीच्या तुलतने त्यात ९०८ म्हणजेच ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मद्यपी चालकांवर कोणता गुन्हा दाखल होणार
वाहन चालकांना शिस्त लागावी व अपघातासारखी दुर्घटना होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होवू नये, मद्यपी चालकांविरोधील कारवाई प्रभावीपणे राबवण्यासाठी आता पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये दखलपात्र गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. मद्यप्राशन करून बेदरकारपणे, धोकादायकरित्या व निष्काळजीपणे वाहन चालवून सामान्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या चालकांना प्रतिबंध करण्यासाठी व कायद्याचा धाक रहावा याकरीता भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२५ अन्वये स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच मोटर वाहन कायदा १८५ व गुन्ह्याच्या स्वरूपानुसार इतर सहकलमे लावण्यात येणार आहेत. त्यानंतर चालक परवान रद्द करण्याची व वाहन जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इतर कायदेशीर अडचणी मद्यपी चालकांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे नाव पोलीस रेकॉर्डवर नोंद होईल. त्यामुळे पारपत्र, परदेशी प्रवास अशा सुविधांबाबत संबंधित व्यक्तीला अडचणी निर्माण होऊ शकतात, असे अधिकाऱ्याने सांगितले.