मुंबई : मध्य रेल्वेवरील वांगणी स्थानकाजवळील पूर्व-पश्चिम परिसराला जोडणारे रेल्वेचे फाटक शुक्रवारी सायंकाळी ७.३० सुमारास बंद करण्यात आले. मात्र, बराच वेळ फाटक उघडलेच नाही. परिणामी, फाटकाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. संतप्त वाहनचालकांनी तेथील कर्मचाऱ्याचे कार्यालय गाठले. त्या वेळी कर्तव्यावर असलेला कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत झोपल्याचे निदर्शनास आले.
वांगणीमधील पूर्व – पश्चिम परिसराला जोडणारे रेल्वेचे फाटक शुक्रवारी सायंकाळी ७.३० सुमारास बंद करण्यात आले. मात्र ३० ते ३५ मिनिटे फाटक बंद होते. परिणामी, वाहनचालकांचा खोळंबा झाला होता. त्यात रुग्णवाहिकाही अडकल्याने गोंधळ उडाला होता. तसेच मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडीही झाली होती. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल.