मुंबईच्या लोकल प्रवासात महिलांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यात तैनात असलेल्या एका होमगार्डनेच मद्यधुंद अवस्थेत महिलांशी गैरवर्तणूक करण्याचा प्रकार बुधवारी रात्री पश्चिम रेल्वेवर घडला. या होमगार्डने महिलांना शिवीगाळ करत काही फेरीवाल्या महिलांचा धोकादायक पद्धतीने पाठलागही केला. महिला प्रवाशांनी ही बाब रेल्वे नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून सांगितली खरी, मात्र या जवानाने अंधेरी स्थानकात उतरून गाडीतून पळ काढला. या जवानाच्या गैरवर्तनाची गंभीर दखल घेत संबंधित होमगार्डवर कारवाई केली जाईल, असे रेल्वे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
पश्चिम रेल्वेवर बुधवारी रात्री सुटलेली विरार गाडी १०.४०च्या सुमारास दादर येथे पोहोचली.
 गार्डच्या मागील बाजूला असलेल्या महिलांच्या डब्यात एक होमगार्ड चढला. मोरे नावाच्या या होमगार्डने मद्यधुंद अवस्थेत सुरुवातीला दरवाजाजवळ किरकोळ वस्तूंची विक्री करणाऱ्या महिला फेरीवाल्यांना उद्देशून शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा प्रवासी महिलांकडेही वळवला. या जवानाची स्थिती पाहून घाबरलेल्या महिलांपैकी काहींनी लगेचच रेल्वे नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून झाला प्रकार सांगितला.
रेल्वे पोलिसांनी याबाबत काही कारवाई करण्याआधीच या जवानाने गाडी अंधेरी स्थानकात शिरताच धावत्या गाडीतून उतरत पळ काढला. या जवानाने काही महिला फेरीवाल्यांचा संशयास्पदरीत्या पाठलाग केल्याचेही काही महिला प्रवाशांनी सांगितले. त्यानंतर गुरुवारी या घटनेबाबत रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या कानावर हा प्रकार घालण्यात आला.
डय़ुटीवर असताना महिलांशी अशा प्रकारे वागणाऱ्या जवानाविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे सिंघल यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास केला जाणार असून त्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. होमगार्डचे जवान रेल्वे पोलिसांच्या मदतीला असतात. मात्र त्यांनीच अशा प्रकारे वर्तन केले असेल, तर ही गंभीर बाब आहे, असे मत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा