दारुच्या नशेत झालेल्या भांडणाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. तानाजी कांबळे (३०) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. हत्या करून फरार झालेला त्याचा मित्र रंजीत नेपाळी (३०) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मालवणी येथे घडली़
तानाजी मालवणी येथे राहणाऱ्या आपल्या भावाकडे नेहमी येत असे. तेथे त्याची ओळख भावाच्या शेजारी राहणाऱ्या रंजीत नेपाळी याच्याशी झाली. दोघे नेहमी दारू पिण्यासाठी जात असत. बुधवारी रात्री दोघे नेहमीप्रमाणे रुईया कंपाउंड येथे दारू पिण्यासाठी गेले. त्यावेळी तानाजी वारंवार खाद्यपदार्थ मागवत होता. त्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यातून संतापलेल्या रंजीतने दगडाने तानाजीच्या डोक्यावर घाव घातले. त्यात त्याचा मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तानाजीचा मोबाइल घेऊन रंजीत फरारी झाला होता. परिसरातील नागरिकांना सकाळी तानाजीचा मृतदेह आढळल्यानंतर या हत्येचा उलगडा झाला.     

Story img Loader