मुंबई : देशात २०२२ मध्ये आलेल्या दोन तीव्र उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागला होता. या उष्णतेच्या लाटा प्रामुख्याने मार्च- एप्रिल २०२२ या कालावधीत आल्या होत्या. दरम्यान, या उष्णतेच्या लाटा वेगवेगळ्या वातावरणीय स्थितीमुळे निर्माण झाल्या असून याचे मुख्य कारण कोरडी माती, तसेच उंचावरील वारे असल्याचे आयआयटी मुंबईच्या अभ्यासातून समोर आले आहे.
आयआयटी मुंबई आणि जोहान्स गुटेनबर्ग विद्यापीठ मेंझ, जर्मनी येथील संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे. मार्च आणि एप्रिल २०२२ मध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा आल्या होत्या. या वर्षांमध्ये तापमानही सरासरीपेक्षा अधिक नोंदले गेले होते.दरम्यान, मार्चमधील उष्णतेची लाट प्रामुख्याने वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे, तसेच उंच वाऱ्यांमुळे आली असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. उच्च-उंचीवरील पश्चिमेकडील वारे उष्णतेच्या लाटेदरम्यान विषुववृत्ताच्या जवळ असलेल्या पश्चिमेकडील वाऱ्यांना ऊर्जा हस्तांतरित करत असल्याने लाटा अधिक मजबूत झाल्या, असे या अभ्यासात नमूद केले आहे.
पाकिस्तान, अफगाणिस्तानमधून आले उष्णतेचे वारे
एप्रिलमधील उष्णतेची लाट मुख्यत्वे कोरड्या मातीच्या परिस्थितीमुळे, तसेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या वायव्य भूभागातून उष्णतेचे वारे भारतात आल्यामुळे निर्माण झाली होती. कोरड्या मातीची परिस्थिती मार्चच्या सुरुवातीच्या उष्णतेच्या लाटेमुळे निर्माण झाली होती, यामुळे आकाश निरभ्र होते. तसेच जमीन आधीच कोरडी झाली होती. परिणामी तापमानातही अधिक वाढ झाली आणि त्यामुळे मार्च महिन्यातील माती अधिक कोरडी झाली होती, असे आयआयटी मुंबई येथील सहयोगी प्राध्यापक आणि अभ्यासाच्या सह-लेखिका अर्पिता मोंडल यांनी स्पष्ट केले. पण जेव्हा माती आधीच कोरडी असते, तेव्हा ती उष्णता थेट वातावरणात परावर्तित करते. त्यामुळे जमिनीवरचे आणि स्थानिक हवामानाचे तापमान वाढते, असेही त्यांनी म्हटले.
उंच वारे म्हणजे काय ?
ज्या वाऱ्यांचा वेग जास्त असतो आणि जे जमिनीपासून उंच पातळीवर वाहतात त्यांना ‘उंच वारे’ संबोधिले जाते. या वाऱ्यांना हवामानशास्त्रात फार महत्त्व आहे. हवामान बदल, वादळ, ढगांची स्थिती आणि पर्जन्यमान यावर त्यांचा प्रभाव असतो. तर, ज्या मातीमध्ये आर्द्रता खूप कमी असते तिला ‘कोरडी माती’ असे संबोधिले जाते. प्रामुख्याने पावसाचा अभाव, जमिनीची धूप यामुळे माती कोरडी होते. तसेच जमिनीच्या ओलसरपणामुळे बाष्पीभवन होऊन ढग तयार होतात. जेव्हा ती प्रक्रिया थांबते, तेव्हा हवामानात असंतुलन निर्माण होते. त्यामुळे हवामान बदलाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळते.
दक्षिण आशियातील अति उष्णतेच्या घटनांचा अंदाज घेण्याची आणि त्यानुसार योग्य ती दक्षता घेण्याची आपली क्षमता सुधारण्यासाठी या यंत्रणा समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हवामान बदल, वारे, या विशिष्ट घटकांची माहिती करून घेतल्यास, त्याचा अभ्यास केल्यास भविष्यातील उष्णतेच्या लाटांचे अंदाज अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करता येतील. त्याचबरोबर त्यावर प्रभावी उपाय करण्यास मदत.- प्रा. मोंडल, सेंटर फॉर क्लायमेट स्टडीजचे संयोजक, आयआयटी मुंबईच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाचे प्राध्यापक