मुंबई : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने बहुविद्याशाखीय शिक्षणाला चालना देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) एकाच वेळी पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर दुहेरी पदवीचे शिक्षण घेण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे प्रत्यक्ष आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात दुहेरी पदवीचे शिक्षण घेता येईल. ‘आयडॉल’ने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालय व स्वायत्त महाविद्यालयांना एक पत्र पाठवून दुहेरी पदवीच्या शिक्षणासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त विषयांमध्ये पदवी घ्यायची असल्यास एका पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा लागत होता. मात्र आता एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विषयांत पदवी शिक्षण घेण्याची मुभा विद्यापीठाने दिली आहे. यानुसार विद्यार्थी एकाच वेळी मराठीबरोबर इतिहास विषयातही पदवी घेऊ शकतो. तसेच दुहेरी पदवी शिक्षणासाठी विद्यार्थी मराठी, गणित, इतिहास, राज्यशास्त्र यांसारख्या पारंपरिक विषयांसह रोजगाराभिमुख आणि विद्यार्थ्यांच्या आवडीच्या कलागुणांशी संबंधित संगीत, चित्रकला, नाट्य आदी विषय निवडू शकतात. एकाच वेळी ‘आयडॉल’मधून एक पदवी आणि विद्यापीठाशी संलग्नित कोणत्याही महाविद्यालयातून दुसऱ्या विषयातील पदवी शिक्षण घेता येणार आहे. तसेच आगामी काळात दुहेरी पदवीसाठीच्या विषयांचीही व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.
हेही वाचा – ‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम
हेही वाचा – मुंबई : खंडणीच्या गुन्ह्यांत सहभागी आरोपीला अटक
‘दुहेरी पदवीचे शिक्षण हे बौद्धिक जिज्ञासा आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देते. तसेच रोजगाराभिमुख विषय निवडण्याचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे नोकरी मिळविताना अडचण येणार नाही. नोकरी सांभाळून शिक्षण घेणारे विद्यार्थी, काही कारणास्तव अर्धवट शिक्षण राहिलेले आणि गृहिणींनाही ‘आयडॉल’च्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेल्या दुहेरी पदवी शिक्षणाचा लाभ होईल’, असे ‘आयडॉल’चे संचालक डॉ. शिवाजी सरगर यांनी सांगितले.