लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : महापालिकेच्या सुरक्षा दलाच्या आस्थापना अनुसूचीवर सुरक्षा रक्षकांची एकूण ३८०९ पदे असून त्यातील सुमारे १९८४ पदे रिक्त आहेत. तसेच, सुमारे १५० सुरक्षा रक्षकांना शहर आपत्ती प्रतिसाद पथकात कर्तव्य बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अतिरिक्त जबाबदाऱ्या आणि रिक्त पदांमुळे सुरक्षा दलातील कार्यरत सुरक्षा रक्षकांवर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे.

प्रशासनाने तात्काळ रिक्त पदे भरावीत, तसेच नव्याने निर्माण केलेल्या सुरक्षा चौक्या, अतिरिक्त जबाबदाऱ्या, पहाऱ्याची ठिकाणे आदींचा आढावा घेऊन आवश्यक नवीन पदे निर्माण करावीत, अशी मागणी द म्युनिसिपल युनियनने पालिका आयुक्तांकडे केली आहे.

आणखी वाचा-मुंबई : सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन परदेशी महिलांना अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई

सुरक्षा चौक्या आणि पहाऱ्याची ठिकाणे सुरक्षेविना ठेवणे शक्य नसल्याने कार्यरत सुरक्षा रक्षकांना अतिरिक्त काम करावे लागत आहे. कामगार कायद्यातील तरतुदींविरोधात जाऊन सलग दोन ते तीन पाळ्यांमध्ये कामगारांना राबविण्यात येत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. गणवेशधारी कर्मचारी असल्याने कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कृतीतून रोष व्यक्त करता येत नसला तरी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. नवीन पदे भरण्यासाठी संघटनेतर्फे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.

रिक्त पदे भरण्यासाठी विद्यमान अर्हतेमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने ऑगस्ट २०२३ मध्ये बैठकही घेण्यात आली होती. या बैठकीत सविस्तर चर्चेअंती प्रस्तावित अहर्तेस संघटनेने मान्यता दिली होती. या बैठकीला दहा महिने उलटूनही अद्याप सुरक्षा रक्षकांची रिक्त पदे भरलेली नाहीत. त्यामुळे लवकरच ही पदे भरून कार्यरत सुरक्षा रक्षकांना दिलासा द्यावा, असेही संघटनेकडून पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to 1984 vacancies in municipal security force work pressure on working security guards mumbai print news mrj
Show comments