मुंबई : अंबरनाथ येथील काकोळे ग्रामस्थांनी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) आणि परप्रांतीय ठेकेदाराविरोधात आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे मुंबईतील रेल्वे स्थानकांत ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा खंडित झाला होता. तर, मंगळवारी आयआरसीटीसीच्या लेखी आश्वासनानंतर काकोळे ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, नवीन पुरवठादाराची नियुक्ती करण्यास विलंब लागणार असल्याने, पुढील एक ते दोन आठवडे मुंबईतील स्थानकांवर ‘रेलनीर’ बाटलीबंद पाणी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.
ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे रेल्वे स्थानकात ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा लक्षणीयरित्या कमी झाला. आता आयआरसीटीसीने ठेकेदारावर कडक कारवाई करण्याचे आणि ग्रामस्थांना प्राधान्याने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थांनी तूर्तास आंदोलन मागे घेतले. आयआरसीटीसीतर्फे ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा अंबरनाथ येथून मुंबईतील रेल्वे स्थानकांत पुरवठा केला जातो. मात्र, १५ ऑगस्टपासून अंबरनाथ येथील काकोळे ग्रामस्थांनी आयआरसीटीसी आणि परप्रांतीय ठेकेदाराविरोधात आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील स्थानकांमध्ये ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा कमी झाला. आयआरसीटीसीचे अधिकारी, अंबरनाथ रेलनीर प्रकल्पाचे व्यवस्थापक व इतर लोकप्रतिनिधींनी मंगळवारी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांची भेट घेतली.
हेही वाचा >>>मुंबई: तिकीट तपासनीसला मारहाण प्रकरणाला धार्मिक वळण
मनोज खाद्यान भांडार या संस्थेवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयआरसीटीसीकडून ग्रामस्थांना देण्यात आले. तसेच पाण्याचा पुरवठा करण्यासाठी काकोळे गावातील १२ मालवाहतूकदारांना प्राधान्य देण्याची शिफारस दिल्ली येथील आयआरसीटीसी कार्यालयाला करण्यात आली आहे. तर, पाणी पुरवठादार कंत्राटदाराच्या नियुक्तीसाठी आणखी विलंब लागेल, त्यामुळे उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती करून आयआरसीटीसीने आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिले. त्यानंतर काकोळे ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
हेही वाचा >>>मुंबईत शिक्षकाकडून लैंगिक अत्याचाराच्या आठवड्याभरात दोन घटना; पाच महिन्यात पोक्सोचे ५०९ गुन्हे
संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याबाबतचा अहवाल दिल्ली येथील आयआरसीटीसीच्या कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. तर, नवीन वाहतूक कंत्राटदाराची नेमणूक करण्यास काहीसा विलंब होणार आहे. त्यामुळे पुढील एक – दोन आठवडे मुंबईतील रेल्वे स्थानकांत ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा होणार नाही, असे आयआरसीटीसीकडून सांगण्यात आले.
आयआरसीटीसीद्वारे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकांत दररोज १५ हजार रेलनीर बाटलीबंद पाण्याचे बाॅक्स पुरवले जातात. प्रत्येक बाॅक्समध्ये १२ बाटल्या असून, दररोज एकूण १.८ लाख बाटल्या स्थानकात पोहचवल्या जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुरवठा ठप्प झाल्याने रेल्वे स्थानकात रेलनीर बाटलीबंद पाण्याचा तुटवडा भासत आहे.