मुंबई :आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध पातळ्यांवर कुष्ठरोग निर्मूलनासाठी होणाऱ्या प्रयत्नांमधून तसेच कुष्ठरुग्णांना करण्यात येणाऱ्या सातत्यपूर्ण औषधोपचारामुळे राज्यातील कुष्ठरुग्णांच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. २०२३-२४ मध्ये दर हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण १.१६ इतके होते ते २०२४-२५ मध्ये म्हणजे सप्टेंबर २०२४ अखेरीस १.०७ इतके झाले आहे.

कुष्ठरोग निर्मूलनासाठी विविध पातळ्यांवर आग्रही प्रयत्न होत असले तरीही समाजामध्ये या आजारासंदर्भात असलेली भिती, गैरसमज यामुळे हा आजार आजही संपुष्टात आलेला नाही. करोना संसर्गानंतर या रुग्णसंख्येमध्ये थोडी वाढ झाली होती. मात्र करोना संपताच आरोग्य विभागाने रुग्ण शोधण्याची व्यपक मोहीम हाती घेतली. जास्तीतजास्त रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यामुळे कुष्ठरुग्णांचे प्रमाण कमी झाल्याचे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ संदीप सांगळे यांनी सांगितले. आरोग्यसेवा( कुष्ठरोग आणि क्षयरोग) विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार २०२१-२२ मध्ये १४,५२० कुष्ठरुग्ण आढळून आले. २०२२-२३ मध्ये यात वाढ होऊन १९,८६० कुष्ठरुग्णांच्या नोंदी करण्यात आल्या असून २०२३-२४ च्या डिसेंबरपर्यंतच्या शोध मोहीमेत २० हजार कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत. जास्तीत जास्त नवीन रुग्ण शोधण्याबरोबरच प्राथमिक अवस्थेमधील रुग्ण शोधून वेळेत उपचार केल्यामुळे कुष्ठरुग्णांचे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे. परिणामी नवीन कुष्ठरुग्णांमध्ये लहान मुलांचेही प्रमाण कमी झाले आहे. बहुतेक कुष्ठरुग्ण हे गरीब असल्यामुळे ते उपजीविकेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात. त्यांच्या उपचारात सातत्य राहावे यासाठी या रुग्णांचा पाठपुरावा करावा लागतो. आशा तसेच कुष्ठरुग्ण कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून यासाठी पाठपुरावा करण्यात आल्याचे डॉ सांगळे म्हणाले.कुष्ठरुग्णांपैकी मल्टीबॅसिलरी (एमबी) कुष्ठरुग्णांवरील उपचार हे १२ महिने केले जातात तर पॅसिबॅसिलरी रुग्णांवरील उपचार हे सहा महिने केले जातात.

हेही वाचा…‘बेस्ट’अधिकाऱ्यांना फौजदारी समन्स ; दिव्यांग चालकांना पर्यायी काम नाकारल्याबद्दल औद्योगिक न्यायालयाकडून समन्स

शहरामध्ये पालिका क्षेत्रामध्ये तर ग्रामीण भागामध्ये विदर्भातील काही विशिष्ट भागामध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण वाढताना दिसते. कुष्ठरुग्णांना शोधून काढण्यासाठी राज्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण मोहिम राबवण्यात आली त्यामुळे अधिकाधिक रुग्णसंख्येची नोंद यामध्ये झाली आहे. ही मोहिम राबवली नसती तर रुग्णांची नोंद मोठ्या संख्येने झाली नसती, त्यामुळे रुग्णसंख्येच्या नोंदीमुळे धास्तावण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. रायगड,पालघर,धुळे, नंदुरबार,जळगाव, नाशिक, धाराशीव, अमरावती, यवतमाळ, भंडरा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा येथे दर दहा हजारी एकापेक्षा जास्त कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत तर नवीन शोधलेल्या कुष्ठरुग्णांचे प्रमाण दर एक लाख लोकांमागे १० पेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये रायगड, पालघर, धुळे, नंदुरबाहर, जळगाव, नाशिक,सातारा, परभणी, हिंगोली, धाराशीव, नांदेड, वाशीम, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा यांचा समावेश आहे. रुग्णांनी नियमितपणे औषधोपचार घेतल्यास हा आजार निश्चितपणे बरा होत असल्यामुळे उपचारासाठी आरोग्य विभागाकडून सातत्यापूर्ण प्रयत्न केले जात आहेत.

कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र हे आरोग्य विभागाचे उद्दिष्ठ असून यासाठी रुग्णशोध मोहीम घरोघरी जाऊन राबविण्याबरोबरच उपचारामुळे हा आजार बरा होऊ शकतो हा विश्वास आम्ही देत आहोत. सातत्याने रुग्णशोध मोहीम राबविण्यात येत असल्यामुळे आकडेवारी जास्त दिसत असून यामुळेच कुष्ठरोग निर्मूलनाचा उद्देश साध्य होण्यास मदत होणार आहे. यात अनेक रुग्ण हे गरीब वर्गातील व स्थलांतरित कष्टकरी असल्याचे दिसून आले असून त्यांना सातत्यपूर्ण उपचार देणे हे आव्हान असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. यासाठी रोजगार मिळविण्यासाठी भटकंती करणारा वर्ग तसेच आश्रमशाळा, विटभट्टी व खाणकामगार तसेच विविध कारणांमुळे स्थलांतरित झालेल्या व्यक्तींचे व्यापक सर्वेक्षण करण्यात आले असून यात ८४९ नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले असून या सर्वांवर औषधोपचार सुरु करण्यात आले आहेत.

हेही वाचा…वांद्रे रेक्लमेशन येथील भूखंड व्यावसायिक क्षेत्र म्हणून तूर्त विकसित नाही;  राज्य सरकारसह अदानी रियाल्टीची न्यायालयात हमी

गेल्या पाच वर्षांपासून शून्य कुष्ठरुग्ण मोहीमेअंतर्गत ज्या गावात शून्य कुष्ठरुग्ण आढळून आले होते अशा २५ हजार गावांची निवड करण्यात येऊन त्यापैकी २२,९१६ गावांचे आशा व कुष्ठरोग कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. यात ६७६ गावांमध्ये ७९३ नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले असून त्यांच्यावरही औषधोपचार करण्यात येत आहेत. महाराष्ट्र कुष्ठरोगमुक्त करणे हे आरोग्य विभागाचे उद्दिष्ठ असून त्यासाठी सातत्याने रुग्णशोध मोहीम राबविण्यात येत असून यात आढळून येणाऱ्या रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार करण्यात येत असल्यामुळेच कुष्ठरुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे डॉ सांगळे म्हणाले.