मुंबई : महाराष्ट्रात राज्याच्या आरोग्य विभागाने सर्वांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतल्यापासून आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येऊ लागले आहेत. काही वर्षांपूर्वी आरोग्य विभागाच्या रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात वर्षाकाठी साडेतीन कोटी रुग्णांवर उपचार केले जायचे. मोफत योजनेमुळे हिच संख्या वाढून तब्बल १३ कोटी लोकांनी गेल्या वर्षभरात बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतले आहे.
आरोग्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आरोग्य विभागाने गेल्या काही वर्षात ग्रामीण रुग्णालयांचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या संख्येने ग्रामीण रुग्णालयांमधील खाटांची संख्या वाढवून उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण आणि उपकेंद्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज राज्यात १९ जिल्हा रुग्णालये, ३६४ ग्रामीण रुग्णालये, ९५ उपजिल्हा रुग्णालये, आठ सामान्य रुग्णालये, २० स्त्री रुग्णालये , पाच क्षयरुग्णालये, पाच मनोरुग्णालये, १९१३ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जवळपास १८ हजार उपकेंद्रांच्या माध्यमातून गरजू रुग्णांवर मोफत उपचार केले जातात.
‘निरोगी महाराष्ट्र’चा संकल्प साध्य करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आपल्या घराजवळ सहजसाध्य आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यावर आरोग्य विभागाचा भर असून त्यादृष्टीने आवश्यक ते प्रयत्न आणि उपाययोजना केल्या जात आहेत. मोफत आरोग्य सेवा पुरविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आरोग्य विभागाच्या आरोग्य केंद्रांमध्ये गेल्या दोन वर्षांत बाह्यरुग्ण आणि आंतर रुग्ण विभागामध्ये आरोग्य सेवा घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
राज्यातील जनतेला प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्य सेवा उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपविभागीय रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, व सामान्य रुग्णालये यांच्यामार्फत पुरविण्यात येतात. विशेष संदर्भीय सेवा जिल्हा रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांमार्फत देण्यात येत आहेत. आरोग्य केंद्रांमध्ये ऑगस्ट २०२१ ते जुलै २०२२ दरम्यान अॅलोपॅथिक आणि आयुष बाह्यरुग्ण विभागात ९ कोटी १२ लाखापेक्षा जास्त रुग्णांनी उपचार घेतले. २०२१-२२ ते २०२३-२४ या कालावधीत दर महिन्याला सरासरी ४८ लाखापेक्षा अधिक बाह्य रुग्ण लाभार्थ्यांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला. ऑगस्ट २०२२ ते जुलै २०२३ दरम्यान ११ कोटी ५९ लाखापेक्षा अधिक बाह्य रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. ऑगस्ट २०२३ ते जून २०२४ दरम्यान १३ कोटीपेक्षा अधिक रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले. याचाच अर्थ महिन्याला सरासरी १ कोटीपेक्षा अधिक रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
आणखी वाचा-‘आश्वासित प्रगती’चे आश्वासनच? राहुल नार्वेकर यांना हाफकिनचा विसर पडल्याची कामगारांची खंत
आरोग्य केंद्रांमधील बाह्य रुग्ण विभागाप्रमाणेच आंतररुग्ण विभागातही आरोग्य सेवांचा लाभ घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आरोग्य केंद्रांमध्ये ऑगस्ट २०२१ ते जुलै २०२२ दरम्यान अॅलोपॅथिक आणि आयुष आंतर रुग्ण विभागात ३९ लाखापेक्षा अधिक रुग्णांनी उपचार घेतले. साधारणपणे दर महिन्याला सरासरी ३ लाखापेक्षा अधिक रुग्णांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला. ऑगस्ट २०२२ ते जुलै २०२३ दरम्यान ४४ लाखापेक्षा अधिक रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. ऑगस्ट २०२३ ते जून २०२४ दरम्यान ४५ लाखांपेक्षा अधिक रुग्णांनांवर दाखल करून उपचार करण्यात आले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जनतेला प्राथमिक आरोग्य सेवा तसेच संदर्भ सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आरोग्य संस्था स्थापन करण्यात येतात. संस्था स्थापन करण्याकरिता सन १९९१ जनगणनेच्या ग्रामीण लोकसंख्येच्या आधारे बिगर आदिवासी क्षेत्राकरिता प्रत्येक ३०,००० लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र, आदिवासी क्षेत्राकरिता प्रत्येक २०,००० लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र, बिगर आदिवासी क्षेत्राकरिता प्रत्येक ५,००० लोकसंख्येसाठी एक उपकेंद्र, आदिवासी क्षेत्राकरिता प्रत्येक ३,००० लोकसंख्येसाठी एक उपकेंद्र तर प्रत्येक ४ ते ५ प्राथामिक आरोग्य केंद्रामागे एक ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यात येते. एकीकडे आरोग्य विभागाच्या रुग्णालयांचा तसेच विविध आरोग्य सेवांचा विस्तार करण्यात येत आहे तर दुसरीकडे मोफत उपचारांमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. मात्र त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, परिचारिका तसेच चतुर्थश्रेणी कर्मचार्यांची संख्या खूपच कमी असल्याने व्यवस्थेवर कमालीचा ताण पडत असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
आणखी वाचा-जिल्हा रुग्णालयांमध्ये होणार ह्रदयविकारातील रक्तवाहिन्यातील गाठ विरघळविणारा उपचार
करोनापूर्वी आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये वर्षाकाठी तीन ते साडेतीन कोटी रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी होत होती तर सुमारे २५ लाख आंतरुग्णांवर उपचार केले जायचे. याच काळात वर्षाकाठी छोट्यामोठ्या मिळून अडीच लाख शस्त्रक्रिया केल्या जायच्या. तेव्हाही आरोग्य यंत्रणेवर पुरेशा डॉक्टरांअभावी ताण पडयचा. आता वर्षाकाठी १३ कोटी बाह्यरुग्ण तसेच ४५ लाखांपेक्षा जास्त आंतररुग्णांवर उपचार करताना कमालीची ओढाताण होत असून पुरेशा डॉक्टर व परिचारिकांची युद्धपातळीवर भरती करणे गरजेचे आहे. आजघडीला आरोग्य विभागात डॉक्टरांची ३० टक्के पदे रिक्त आहेत तर सुपरस्पेशालिटी डॉक्टरांची ६३ टक्के पदे रिक्त असल्याचेही आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
आगामी काळात २३ कॅथलॅब बसविण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात ह्रदयविकाराच्या रुग्णांवर उपचार होतील. तसेच मुतखड्यावरील शस्त्रक्रियेसाठी लिथोट्रेप्सी मशीन, कर्करुग्णांवरील सेवेचा विस्तारासह अनेक योजना आरोग्य विभागाने हाती घेतल्या असून यासाठी मोठ्या प्रमाणात डॉक्टर तसेच प्रशासकीय यंत्रणा उभारावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.