Heavy Rain Alert Mumbai : मुंबईत बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून पाणी साचल्यामुळे अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तसेच अपघातामुळे सागरी किनारा रस्त्यावरील वाहतुकही गुरूवारी सकाळी बंद करण्यात आली होती. याशिवाय ठिकठिकाणे वाहने व बस बंद पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.
मुंबईत कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे गुरूवारी जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला. सागरी किनारा रस्त्यावर खासगी वाहनांचा अपघात झाल्यामुळे सकाळी १०.३० च्या सुमारास दक्षिण वाहिनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे वाहने ब्रीच कॅन्डी रुग्णालयाकडून बाबूलनाथ मंदिर, मरिन ड्राईव्ह मार्गे मार्गस्थ होत होती. दुपारनंतर येथील वाहतूक सुरू करण्यात आली. याशिवाय अंधेरी सब वे येथे दीड फूट पाणी साचल्यामुळे दुपारी तेथील वाहतूकही बंद करण्यात आली. तेथील वाहतूक तिवारी चौकातून अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात वळवण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. तसेच पाणी साचल्यामुळे डी.एन. नगर येथील वाहतूक एस.व्ही. रोड ते गोखले पूल, तसेच उत्तरेकडील वाहतबक ठाकरे पूलमार्गे वळविण्यात आली होती. याशिवाय पूर्व मुक्त मार्गावर पोल क्रमांक २६० ते २८० दरम्यान पाणी साचले होते. त्यामुळे तेथील वाहतुकही संथ गतीने सुरू होती. वाहन बंद पडल्यामुळे बुधवारी रात्रीही मुक्त मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.
हे ही वाचा… Mumbai Heavy Rain : मुंबईत शुक्रवारपर्यंत अतिवृष्टी, हवामान विभागाचा इशारा
परळ टीटी परिसरात बस बंद पडल्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती. तसेच बॅलार्ड पिअर परिसरात बसमध्ये बिघाड झाल्यामुळे शहीद भगतसिंह मार्गावरील वाहतुकही धीम्या गतीने सुरू होती. त्याचप्रमाणे कोतवाल गार्डन उत्तर वाहिनीवरही बस बंद पडल्यामुळे वाहतूक संथ गतीन सुरू होती. याशिवाय बीकेसी जोड रस्त्यावरही बस बंद पडल्यामुळे तेथील वाहतकीवर परिणाम झाला होता. याशिवाय कामराज नगर येथे वाहतूक संथ गतीने सुरू होती.
हे ही वाचा… मुंबई : पावसामुळे लोकल मंदावली
मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती. याशिवाय अंधेरी सब वे येथेही पाणी साचले होते. याशिवाय कुर्ला एल.बी.एस. रोड परिसरातही वाहने संथगतीने मार्गस्थ होत होती. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहने बंद पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता.