विनायक डिगे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : वातावरणातील बदल, प्रदूषण, बांधकामस्थळी नियमांच्या उल्लंघनामुळे डासांची पैदास अशा कारणांमुळे सरत्या वर्षात मुंबईत साथीच्या आजारांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांत डेंग्यू, हिवताप, डोळे येणे, गोवर, गालगुंड याच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांच्या संख्येत यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. डोळे येणे, गालगुंड याच्या प्रादुर्भावास बदलते वातावरण आणि प्रदूषण कारणीभूत ठरत आहे. बांधकामांमुळे अनेक ठिकाणी पाणी साचून डासांची पैदास झाल्याने डेंग्यूच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. बदलते वातावण आणि प्रदूषण यामुळे विषाणूंना परिवर्तनासाठी (म्युटेशन) पोषक स्थिती निर्माण होत असल्याने ते अधिक घातक ठरत असल्याचे बॉम्बे रुग्णालयातील कान, नाक, घसा विभागाचे सल्लागार डॉ. मिनेश जुवेकर यांनी सांगितले. प्रदूषणामुळे रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. मधुमेह, मूत्रपिंडविकार, रक्तदाब असलेल्या रुग्णांना आजारांची बाधा होण्याची अधिक शक्यता असल्याचे जे.जे. रुग्णालयातील क्षयरोग विभागाचे प्राध्यापक डॉ. रोहित हेगडे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>राज्यसभा, विधान परिषद निवडणूक :पवार, ठाकरे गटांपुढे संख्याबळाचे आव्हान

हिवताप, डेंग्यूचा वर्षभर ‘ताप’

देशामध्ये महाराष्ट्रात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे आढळून आले आहे. डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण ऑगस्ट ते ऑक्टोबर म्हणजे पावसाळ्यात होते. हा परिणाम डिसेंबरपर्यंत दिसून येतो. महापालिकांने वारंवार सूचना केल्यानंतरही बांधकाम व्यावसायिकांनी दुर्लक्ष केल्याने बांधकामस्थळी साचलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास झाल्याची शक्यता सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्याकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी बोलून दाखविली.

रोगांची तीव्रता वाढणार?

●प्रदूषणामुळे आजारांची तीव्रता अधिक वाढण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तविली आहे. लसीकरणामुळे लहान मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते. मात्र लसीकरण न झालेल्यांना विषाणूजन्य आजारांचा अधिक धोका असतो.

●वयाच्या ६० वर्षांनंतर लसीकरणाची तीव्रता कमी होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना गोवर व गालगुंड होण्याची शक्यता अधिक असते, असे इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर ऑफ मेडिसिनचे मुंबई शाखेचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी सांगितले.

वर्षभरातील रुग्णसंख्या

इन्फलुएंझा ए १,८८५

डोळे येणे ७,८३८

डेंग्यू ३,७५३

मलेरिया ४,९१६

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to increase in the number of dengue winter fever measles patients in the area including mumbai due to climate change pollution violation of rules at construction sites amy