मुंबई : ग्रामीण आरोग्य केंद्राच्या ठिकाणी निवासाची व्यवस्था नसल्याने वैद्यकीय विद्यार्थ्यांना आंतरवासिता करताना आरोग्य केंद्रावर जाण्यासाठी पदरमोड करून ये-जा करावी लागते. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाकडून त्यांच्या प्रवासातील सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने त्यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी अनेकदा त्यांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप असोसिएशन ऑफ मेडिकल इंटर्न्स महाराष्ट्र (अस्मी) या आंतरवासिता विद्यार्थ्यांच्या संघटनेकडून करण्यात आला आहे.
नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झाल्यावर ग्रामिण भागात आंतरवासिता करणाऱया विद्यार्थ्याचा १ जानेवारी रोजी रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर ग्रामिण आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या निवास व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. अनेक भागांत ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये कोणतीही निवासाची व्यवस्था नसल्याने येथील आंतरवासिता करणाऱ्या विद्यार्थ्यांना दूर राहून केंद्रापर्यंत रोज प्रवास करावा लागतो. या विद्यार्थ्यांना आरोग्य केंद्रावर नेण्यासाठी वाहन व्यवस्था किंवा त्यांची तेथेच त्यांच्या निवासाची व्यवस्था करणे वैद्यकीय महाविद्यालयाला बंधनकारक असते. मात्र राज्यातील सरकारी व खासगी वैद्यकीय महविद्यालयाकडून त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांना दररोज आरोग्य केंद्रावर ये-जा करण्यासाठी स्वत: पदरमोड करून सेवा देण्यासाठी जावे लागत आहे. राज्यातील बहुतांश सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये अशीच परिस्थिती आहे. यामध्ये मुंबईसारख्या शहरातील सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयेही मागे नसल्याचे ‘अस्मी’कडून सांगण्यात आले. याबाबत ‘अस्मी’कडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून यामध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा…म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ५५५ घरांसाठी सोडत २० टक्के योजनेतील घरे, आठवड्याभरात जाहिरात
कायदा काय आहे
वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना आंतरवासिता प्रशिक्षणादरम्यान आरोग्य केंद्रांमध्ये वर्षातून दोनवेळा १५ दिवस सेवा देणे बंधनकारक असते. या विद्यार्थ्यांना या केंद्रावर ये-जा करण्यासाठी किंवा त्यांची तेथेच निवासाची व्यवस्था करण्याची हे वैद्यकीय महाविद्यालयाला बंधनकारक आहे.