मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक नामांकित सरकारी-महापालिका रुग्णालये आहेत. अगदी ब्रिटिशकाळापासून आरोग्यसेवा पुरवत असलेल्या या रुग्णालयांतून उपचार घेण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून रुग्णांचे लोंढे येत असतात; परंतु तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी या मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे रुग्णांची परवडच अधिक होत आहे. त्यामुळे एकीकडे रुग्णसंख्या क्षमतेच्या दुप्पट आणि आवश्यक मनुष्यबळ निम्मेही नाही, असे चित्र मुंबईतील प्रमुख रुग्णालयांत दिसते.
मुंबईतील महापालिका आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये अपुरे मनुष्यबळ ही मोठी समस्या आहे. विशेषत: चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यांची कमतरता येथील प्रमुख समस्या आहे. मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर आणि शीव रुग्णालयांमध्ये १ लाख ४५ हजार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. जे.जे. रुग्णालयामध्ये १९६० मध्ये ८०९ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे मंजूर झाली. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पदभरतीच झालेली नाही. त्यात दरवर्षी कर्मचारी निवृत्त होत असल्याने सध्या या रुग्णालयात अडीचशे पदे रिक्त आहेत. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे क्ष किरण तपासणी, रक्ताच्या चाचण्या, शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना नेणे यांसारखी अनेक कामे रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागतात. त्यातच नातेवाईक आणि डॉक्टरांशी उडणारे खटके याचा परिणाम रुग्णसेवेवर होतो.
चांगली आरोग्य सेवा देता यावी यासाठी प्रशासनाने कर्मचारी भरती करणे आवश्यक असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहसरचिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले.महापालिका आणि राज्य सरकारच्या मुंबईतील रुग्णांची वाढती संख्याही रुग्णसेवेवरील ताण वाढवते. नियमानुसार एका कक्षामध्ये ४० रुग्ण असणे अपेक्षित आहे. मात्र मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील प्रत्येक कक्षामध्ये सरासरी १२० ते १५० रुग्ण आहेत. रुग्णांच्या तुलनेत परिचारिकांचे प्रमाणही व्यस्त आहे. भारतीय परिचारिका परिषदेच्या नियमानुसार सहा रुग्णांमध्ये एक परिचारिका हे प्रमाण असताना पालिका रुग्णालयांत एका परिचारिकेवर ३० ते ४० रुग्णांची जबाबदारी आहे. परिचारिकांची ५० हजार रिक्त पदे भरली नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे दी म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी सांगितले.
केईएम रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांपैकी २५ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील, तर २५ टक्के रुग्ण हे देशातून उपचारासाठी येत असतात. त्यामुळे या रुग्णालयातील २२५० खाटा सदैव भरलेल्या असतात. केईएममध्ये येणाऱ्या रुग्णांना सर्वतोपरी सेवा देण्यासाठी आम्ही सज्ज असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन देसाई यांनी दिली.