मुंबई : मोबाइलचा बेसुमार वापर, मैदानी खेळांमधील कमी रूची या विविध कारणांमुळे बहुतांश मुलांमध्ये लघुदृष्टिदोष (मायोपिया) निर्माण झाल्याने चष्मा लावावा लागत आहे. शिवाय यावर उपाययोजना न केल्यास येत्या दहा वर्षांत या दोषाचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढण्याची भीती नेत्ररोग तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशिया खंडात सिंगापूर, कोरिया आणि जपान या देशांत लघुदृष्टिदोष असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. भारतात २०३० पर्यंत ४० टक्के मुलांना लघुदृष्टिदोष होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.मोबाइलचा अतिवापर, खाण्यातील अनियमितता, मैदानी खेळांचा अभाव या कारणांमुळे या दोषाची लागण होत असल्याचा डॉक्टरांचा दावा आहे.

हेही वाचा…दहशतवादी गटाला मदत केल्याप्रकरणी तीन बांगलादेशींना पाच वर्षांची शिक्षा

वयाच्या तीन ते १८ वर्षे कालावधीत मुलांमध्ये लघुदृष्टी दोषाची समस्या वाढत आहे. आजवर १,६०० मुलांच्या डोळ्यांच्या केलेल्या तपासणीत ९४६ मुलांमध्ये दोष आढळून आल्याची माहिती दृष्टीपटलतज्ज्ञ डॉ. जय गोयल यांनी दिली.टीव्ही, मोबाइलचा अतिरिक्त वापर, अनुवांशिकपणा, दैनंदिन कामात दूरचे बघण्याची गरज न पडणे यामुळे गेली काही वर्षे लहान मुलांमध्ये या दोषाचे प्रमाण वाढत आहे. सध्या भारतात हे प्रमाण ३० टक्के आहे. मात्र, पुढील काही वर्षांत भारतातील रुग्णसंख्या वेगाने वाढण्याची शक्यता ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. शशी कपूर यांनी वर्तविली.

निरोगी डोळ्यांसाठी सूर्यप्रकाश महत्त्वाचा असतो. लहान मुलांचा मैदानी खेळांकडे कल कमी झाल्याने त्यांचा सूर्यप्रकाशाशी थेट संपर्क येत नाही. परिणामी डोळ्याचा पडदा कमकुवत होतो. डोळ्याच्या पडद्याचा आकार साधारणपणे २४ मिमी इतका असतो. लघुदृष्टिदोष झाल्यास नजरेचा क्रमांक वाढतो. पण पडदा तितकाच असतो. त्यामुळे पडद्यावरील ताण वाढतो. ठरावीक पातळीनंतर तो फाटतो आणि कायमचे अंधत्व येते, अशी माहिती नेत्ररोग तज्ज्ञ व कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जनचे (सीपीएस) अध्यक्ष डॉ. अजय सांबरे यांनी सांगितले.

हेही वाचा…मुंबई कचरामुक्तीच्या दिशेने शहरातील कचरा निर्मिती, विल्हेवाटीसाठी पालिकेचा अभ्यास; अनुभवी संस्थेची लवकरच नेमणूक

लघुदृष्टिदोष म्हणजे काय

सतत जवळचे पाहत असल्याने हळूहळू दूरचे दिसणे बंद होते. यालाच लघुदृष्टीदोष असे म्हणतात.

लघुदृष्टीदोषाची लक्षणे

मुलांना शाळेमध्ये फळ्यावर लिहिलेले दिसत नाही. टीव्ही जवळ जाऊन पाहणे, मोबाइल किंवा पुस्तक तोंडासमोर धरून पाहणे, डोळ्यातून पाणी येणे, सतत डोळे चोळणे.

भविष्यातील धोके

लहान मुलांमध्ये लघुदृष्टिदोष निर्माण झाल्यावर त्यांच्या चष्म्याचा क्रमांक हा ‘मायनस थ्री’ इतका असतो, मात्र, वाढत्या वयाप्रमाणे चष्म्याचा क्रमांक वाढून त्यांच्या डोळ्यांच्या पडद्याला इजा पोहोचून कायमचे अंधत्व येण्याची शक्यता असते. तसेच ग्लुकोमा व मोतीबिंदूसारखे नेत्रविकार होण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to mobile use and of and less outdoor sports are causing myopia in many children mumbai print news sud 02