शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी उत्स्फूर्तपणे सर्वत्र बंद पाळण्यात आला. या बंदबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रतिक्रिया फेसबुकवर व्यक्त करणाऱ्या आणि त्यावर ‘लाइक’ करणाऱ्या दोघींना पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. शाहीन धाडा असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव असून, ती पालघरची राहणारी आहे. ‘आपण भगतसिंग, सुखदेव यांच्या स्मृती जागविल्या पाहिजेत. ठाकरे यांच्या निधनानंतर बंद करायला नको,’ असे या तरुणीने फेसबुकवर म्हटले होते, असे समजते. त्यावरून पोलिसांनी तिला कलम ५०५ (२) नुसार अटक केली. शाहीन धाडाची फेसबुक मैत्रीण रेणू हिने या प्रतिक्रियेला ‘लाईक’ केले म्हणून तिलाही या कलमान्वये अटक करण्यात आली होती. सोमवारी त्यांना जामीन देण्यात आल्याचे त्यांचे वकील सुधीर गुप्ता यांनी सांगितले. या प्रतिक्रियेमुळे संतप्त झालेल्या सुमारे ४० शिवसैनिकांच्या जमावाने रविवारी धाडा हिच्या नातेवाईकांच्या पालघर येथील रुग्णालयातील मालमत्तेची नासधूस केल्याचेही समजते.
दरम्यान, कोकण परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांना या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Story img Loader