मुंबई/ठाणे : मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व शहरांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी सोडला खरा; पण हा विकासाचा घाटच नागरिकांची वाट बिकट करू लागला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई या शहरांमध्ये सुरू असलेली रस्ते तसेच मेट्रो आणि अन्य पायाभूत प्रकल्पांची कामे अर्धवट अवस्थेत थांबली आहेत. या अर्धवट कामांमुळे अरुंद झालेले रस्ते, त्यांवर पडलेले खड्डे, कमीअधिक उंचीमुळे पाणी साचण्याचे प्रकार आणि वाहतूक कोंडी अशा विविध कारणांमुळे अनेक रस्त्यांवरून वाहने चालवताना चालकांची दमछाक होऊ लागली आहे.
येत्या दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेला दिल्यानंतर पालिकेने फेब्रुवारीमध्ये रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ झाला. मात्र, त्यानंतर विविध कारणांमुळे प्रत्यक्ष कामे सुरू होण्यास विलंब झाला. नियमाप्रमाणे एक जूनला ही कामे थांबवावी लागली. त्यामुळे जवळपास ५० रस्त्यांवरील कामे थांबली आहेत. ही कामे सुरक्षित पद्धतीने बंद करण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे. मात्र, अनेक रस्त्यांवर पसरलेली खडी, विखुरलेले बॅरिकेड्स पाहायला मिळत आहेत. त्यातच अर्धवट काम झालेल्या रस्त्यांवर पाणी साचणे, खड्डे यांमुळे वाहतुकीत अडथळे येत आहेत. दरम्यान, या कामांची जबाबदारी पूर्णपणे कंत्राटदारांची असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी स्पष्ट केले. कंत्राटदारांनी या रस्त्यावरील खड्डे न भरल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे जिल्ह्यातही फारसे वेगळे चित्र नाही. ठाणे शहरातून जाणारा मुंबई-नाशिक महामार्ग, शिळफाटा, घोडबंदर तसेच अंतर्गत मार्गावर कोंडी होत आहे. ठाण्यात पालिकेच्या माध्यमातून रस्ते दुरुस्ती पावसाळय़ातही सुरू असल्याचे दिसते. यामुळे अंतर्गत मार्गावरही वाहतूक संथगतीने सुरू असते. मेट्रो कामांमुळे घोडबंदर, पूर्व द्रुतगती महामार्गावर एमएमआरडीएने लोखंडी मार्गावरोधक बसविले आहे. तेही वाहतुकीत अडथळा ठरत आहेत. भिवंडी-कशेळी मार्ग, कल्याण येथील शिवाजी चौक, डोंबिवली येथील एमआयडीसी भागातही अर्धवट कामांमुळे रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत. त्याला खराब रस्त्यांची जोड आहेच. नवी मुंबई, वसई या शहरांमध्येही अर्धवट रस्ते कामे त्रासदायक ठरत आहेत. वसई-विरार शहरांत नाले उभारणीची कामे अर्धवट अवस्थेत असून त्याचे बांधकाम साहित्य रस्त्यावर पसरून वाहतुकीत बाधा ठरत आहे.