मुंबई : मागील चार वर्षांपासून औषधांची देयके प्रलंबित असल्याने १५० औषध वितरकांनी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना करण्यात येणारा औषधांचा पुरवठा सोमवारपासून बंद केला आहे. तसेच प्रशासनाकडून देयके मंजूर करण्याबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. परिणामी पुढील काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषध आणीबाणी निर्माण होऊन रुग्णांचे औषधाविना हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेतील वैद्यकीय महाविद्यालये व उपनगरीय रुग्णालयांना औषध पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले दर करारपत्र हे चार वर्षांपूर्वीच संपुष्टात आले आहे. महानगरपालिकेकडून नव्याने दर करारपत्र तयार न केल्याने औषध वितरक प्रशासनाची विनंती मान्य करून औषध पुरवठा करत आहेत. तसेच रुग्णालयांमधून स्थानिक पातळीवर औषध खरेदी केली जात आहे. अशा प्रकारे विविध माध्यमातून खरेदी करण्यात येणाऱ्या औषधांची जवळपास १२० कोटी रुपयांपेक्षा अधिक देयके प्रलंबित आहेत. त्या प्रलंबित देयकांबरोबरच औषध पुरवठा करण्यापूर्वी भरावी लागणारी आगाऊ रक्कम आणि दक्षता विभागाकडून घेतलेली रक्कम यांचा समावेश आहे. मागील चार वर्षांपासून ही देयके महानगरपालिकेकडून प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. परिणामी अनेक वितरकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, तसेच नव्याने औषधे खरेदी करणे ही कठीण झाले आहे. वितरकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. देयके मंजूर करण्यासंदर्भात वेळोवेळी मुंबई महानगरपालिकेकडे वितरकांकडून पाठपुरावा करूनही देयके मंजूर न झाल्याने अखेर सोमवारपासून मुंबई महानगरपालिकेला करण्यात येणारा औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय १५० वितरकांनी घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, कूपर, शीव या वैद्यकीय महाविद्यालयांबरोबरच उपनगरीय रुग्णालयांमध्ये पुढील काही दिवस पुरेल इतकाच औषधांचा साठा उपलब्ध आहे. महानगरपालिका प्रशासनाने तातडीने देयके मंजूर न केल्यास रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशन या वितरकांच्या संघटनेकडून वर्तविण्यात आले आहे.
औषधांचा पुरवठा बंद करण्याच्या वितरकांच्या निर्णयानंतर सोमवारी मुबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी तातडीने देयके मंजूर करून आठवडाभरामध्ये देयकांचे पैसे वितरकांना मिळतील, असे आश्वसन वितरकांना दिले. मात्र प्रशासनाकडून देयके मंजूर करण्याबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हा पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले.
वितरकांच्या औषधांची देयके प्रलंबित असल्याप्रकरणी सर्व रुग्णालयांचे अधिष्ठाता व लेखा विभागाच्या प्रमुखांची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीमध्ये सर्व वितरकांची देयके मंजूर करण्याचे काम जलद गतीने करण्याचे आदेश दिले. तसेच याची माहिती ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डरच्या अध्यक्षांना देण्याच्या सूचना लेखा विभागाला दिले आहेत. तसेच सर्व रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध असल्याने नागरिकांना घाबरण्याचे कारण नाही. संजय कुऱ्हाडे, उप आयुक्त आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिका