मुंबई पोलिसांमध्ये काही असे अधिकारी होते जे एन्काऊंटरच्या नावाखाली थंड डोक्याने गुन्हेगारांना ठार करत असत असा धक्कादायक खुलासा माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केला आहे. त्यांना जेव्हा मुंबईत जॉईंट सीपी क्राइम या पदावर नियुक्त करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर एन्काऊंट स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांना नियंत्रणात आणण्याची जबाबदारी होती असंही त्यांनी सांगितलं.
मीरा बोरवणकर काय म्हणाल्या?
मला जेव्हा क्राईमच्या जॉईंट सीपीचं पद देण्यात आलं तेव्हा मला हे सांगण्यात आलं होतं एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून जे अधिकारी काम करत आहेत त्यांच्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. काही अधिकारी त्यावेळी दबाव, राजकीय दबाव यांच्या खाली थंड डोक्याने एन्काऊंटर करु लागले होते. मी जेव्हा ते पद स्वीकारलं तेव्हाच्या एक दोन घटना सोडल्या जसे की हसीना पारकर, विकी मल्होत्रा ही प्रकरणं सोडली तर मला बराच पाठिंबा मिळाला.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट माझ्याशी फार बोलायचे नाहीत
एन्काऊंटर स्पेशालिस्ट यांना काहीसं अवघडलेपण होतं. कारण मी पैसे घेत नाही. तसंच मी महिला आहे त्यामुळे माझ्याशी सगळं कसं काय बोलायचं हा त्यांना थोडा प्रश्न पडत असे. एक मात्र मला ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट सांगत असत की तुम्ही २००४-०५ मध्ये जे प्रकरण हाती घेत आहात त्याचा निकाल २०१४-१५ पर्यंत लागणार नाही. त्या दरम्यान हे आरोपी जामिनावर बाहेर येणार आणि शूट आऊट करणार हे तुम्हाला चालेल का? आपल्या गुन्हेगारी न्याय व्यवस्थेची अगतिकता मला त्यांच्या बोलण्यातून जाणवली.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट काय सांगायचे?
एन्काऊंटर करणारे ते अधिकारी मला सांगत असत की जर आम्ही त्यांचा एन्काऊंटर केला नाही तर ते गुन्हेगार इतर काही लोकांना ठार करतील. त्यांचा मुद्दा मला पटत होता. त्यामुळे मी त्यांना पूर्ण नियंत्रणात ठेवू शकले नाही पण ९० ते ९५ टक्के अधिकारी माझ्या बाजूने होते. मला एन्काऊंटरचा शॉर्टकट पसंत नव्हता असंही मीरा बोरवणकर यांनी सांगितलं. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत मीरा बोरवणकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. मला त्यावेळी दोन महत्त्वाचे अधिकारी सांगायचे मीरा तू तुझं महिन्याला एक कोटींचं नुकसान करुन घेते आहेस. पण मला त्याने काही फरक पडला नाही. कारण पैसा कमवणं हे माझं ध्येयच नव्हतं.