पावसाने दडी मारल्याने व उन्हाचे चटके बसू लागल्याने राज्यातील विजेची कमाल मागणी १६५०० मेगावॉटपर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल दीड हजार मेगावॉटने अधिक आहे. परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्र पाण्याअभावी बंद असून ते पुढील वर्षीपर्यंत बंदच राहण्याची चिन्हे आहेत.
विदर्भ, कोकण वगळता राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिल्याने धरणांमधील पाणीसाठा कमी आहे. पाऊस नसल्याने विहिरी, नद्या-नाले यातून जेथे पाणी उपलब्ध आहे, तेथे शेतकऱ्यांनी पिके जगविण्यासाठी कृषिपंपांचा वापर सुरू केला आहे. त्याचबरोबर उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्याने वातानुकूलन यंत्र आणि अन्य वीजवापर वाढला आहे. परिणामी जी विजेची मागणी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये असते, ती सप्टेंबरपासूनच सुरू झाली आहे. सध्या विजेची कमाल मागणी १६ हजार ५०० मेगावॉटपर्यंत गेली असून महानिर्मितीव्यतिरिक्त अन्य कंपन्यांकडून वीज उपलब्ध होत आहे. महानिर्मितीचे परळी येथील औष्णिक वीज केंद्र पाणी उपलब्ध नसल्याने गेले काही महिने बंद आहे.