मुंबई : पश्चिम रेल्वेवरील विवार स्थानकातील फलाट क्रमांक १ वर सकाळी ७.३४ च्या सुमारास सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले. परिणामी, मंगळवारी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना विलंबाने धावणाऱ्या लोकलचा फटका बसला.
विरार स्थानकातील फलाट क्रमांक १ चा वापर अप लोकल गाड्यासाठी करण्यात येतो. या फलाटजवळच सकाळी ७.३४ च्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे या फलाटाच्या दिशेने गाड्या येऊ शकल्या नाहीत. त्यातच एक वातानुकूलित लोकलही खोळंबली होती. या फलाटावर लोकल येऊ शकत नव्हत्या. परिणामी, विरार येथून चर्चगेटच्या दिशेनेही लोकल सुटू शकल्या नाहीत. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रक बिघडले. या प्रकारामुळे लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत.
या प्रकारामुळे प्रवाशांना सकाळी गर्दीचा सामना करावा लागला. सरकारी कार्यालये बंद असली तरी काही खासगी कार्यालये सुरू आहेत. त्यामुळे मंगळवारी सकाळी लोकल गाडयांना गर्दी होती. लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांनाही फलाटावर बराच वेळ ताटकळत राहावे लागत आहे. सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती करण्यासाठी पश्चिम रेल्वेला एक तास लागला. सिग्नल यंत्रणा दुरुस्त होताच फलाट १ वर थांबलेली वातानुकूलित लोकल ८.४५ च्या सुमारास सोडण्यात आली. दरम्यान, पावसामुळे मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मार्गावरील लोकलही पाच ते दहा मिनिटे विलंबाने धावत आहेत.