मुंबई : कळवा स्थानकाजवळच सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवरील कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत. सिग्नल यंत्रणेत सकाळी ४.३० च्या सुमारास बिघाड झाला होता. सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी एक तास लागल्याने लोकलच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडाला.
कळवा स्थानकाजवळील कारशेड ते डाउन धीम्या मार्गावर पहाटे ४.३० च्या सुमारास सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड झाला. कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांना सिग्नल मिळत नसल्याने लोकल गाड्यांचा वेग मंदावला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुरुस्तीसाठी वेळ लागल्याने कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल उशिराने धावत होत्या. त्याचा काहीसा परिणाम कल्याण डोंबिवलीतून सीएसएमटीच्या दिशेने सुटणाऱ्या लोकलवरही झाला. सिग्नल यंत्रणेतील दुरुस्तीचे काम सकाळी ५.३० पर्यंत पूर्ण झाले. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रक काहीसा परिणाम झाला.
कल्याण आणि सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या लोकल अद्यापही साधारण १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत असल्याने ऐन कार्यालयीन वेळेत फलाट आणि लोकल गाड्यांना प्रवाशांची गर्दी झाली आहे. वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी काहीसा वेळ लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड वाढतच असून त्यामुळे वारंवार लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे.