‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो ३’ मार्गिकेवरील मेट्रो गाडीत बुधवारी दुपारी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ‘मेट्रो १’ची सेवा सुमारे पाऊण तास ठप्प झाली होती. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडमधील (एमएमओपीएल) अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही गाडी रूळावरून हटवून कारडेपोत नेली. मात्र यामुळे सुमारे ४५ मिनिटे ‘मेट्रो १’ची सेवा पूर्णतः बंद होती. सायंकाळी ५.३० च्या सुमारास ‘मेट्रो १’वरील सेवा पूर्ववत झाली. मात्र ऐन गर्दीच्या वेळी सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
एमएमओपीएलने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ४. ४५ वाजता असल्फा मेट्रो स्थानकावरून अंधेरी – घाटकोपरच्या दिशेने निघालेली मेट्रो गाडी अचानक बंद पडली. गाडीच्या इलेक्ट्रिकल कन्व्हर्टर युनिटमध्ये बिघाड झाल्याने गाडी बंद पडली. यासंबंधीची माहिती मिळताच एमएमओपीएलच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना गाडीतून खाली उतरवले आणि त्यानंतर ही गाडी कारशेडमध्ये नेण्यात आली. या सर्व प्रक्रियेत ४५ मिनिटे लागली. परिणामी, यादरम्यान ‘मेट्रो १’ची सेवा पूर्णतः बंद ठेवावी लागली. याचा फटका मात्र प्रवाशांना बसला. कार्यालये सुटण्याच्या वेळी सेवा बंद झाल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक प्रवाशांनी रेल्वे वा इतर पर्याय निवडत इच्छित स्थळ गाठण्यास प्राधान्य दिले. सायंकाळी ५.३० वाजता ‘मेट्रो १’ची सेवा पूर्ववत झाली आणि प्रवाशांना दिलासा मिळाला.
हेही वाचा >>>राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील सुरक्षेचे लेखापरीक्षण होणार
मागील आठवड्यातही १५ मिनिटे सेवा बंद होती
‘मेट्रो १’ मार्गिकेत तांत्रिक बिघाड होऊन सेवा बंद होण्याच्या घटना अनेकदा घडतात. एकदा तर ओव्हरहेड वायरवर कावळा बसल्याने ‘मेट्रो १’ बंद पडल्याचा प्रकारही घडला होता. आता काही दिवसांपूर्वी १८ एप्रिल रोजी ओव्हरहेड वायरवर ताडपत्री पडल्याने घाटकोपरच्या दिशेने जाणारी मार्गिका १५ मिनिटे बंद होती. संध्याकाळी आझादनगर मेट्रो स्थानकानजीक हा प्रकार घडला होता. समोरच्या इमारतीवरील ताडपत्री पडल्याने मेट्रो सेवेवर परिणाम झाला. त्यामुळे एमएमओपीएलकडून इमारतीच्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.