चीनसह विविध देशांमध्ये करोनाच्या विषाणूचा पुन्हा उद्रेक झाल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर व शारीरिक अंतर पाळण्याचे आवाहन केले आहे. तर लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना राबविण्याचे आदेश राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील मंदिर प्रशासनही सतर्क झाले आहे. करोनाविषयक नियमांची सक्ती करण्यात आली नसली, तरीही मंदिरात येणाऱ्या भाविकांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी मुखपट्टीचा वापर करावा, तसेच शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा- जगात करोना वाढत असताना रुग्णालयात औषधांची कमतरता; माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा दावा
अनेक मुंबईकर, तसेच पर्यटक आवर्जून मुंबईतील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी जातात. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतील नागरिकांचाही त्यात समावेश असतो. चीनमध्ये करोना उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध मंदिरांच्या प्रशासनांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबादेवी मंदिर व्यवस्थापनाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना मुखपट्टीचा वापर बंधनकारक केला आहे. तर विशेषतः सुरक्षा रक्षकांना मुखपट्टीसह हातमोजे वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘चीनमध्ये झालेल्या करोना उद्रेकानंतर मुंबादेवी मंदिर व्यवस्थापन समितीची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा- करोनाचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज
मुंबादेवी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मुखपट्टी वापरण्याची विनंती करण्यात येत आहे. हा नियम भाविकांसाठी बंधनकारक नाही. परंतु स्वतःसह इतरांचे आरोग्य सुरक्षित राहावे या उद्देशाने भाविकांनी करोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुंबादेवी मंदिराचे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी केले आहे. ‘दररोज देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक गणपतीच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात येत असतात. मंदिरात तात्काळ करोनाविषयक नियमांची सक्ती करण्यात आली नसली, तरी नागरिकांना स्वत:च्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुखपट्टीचा वापर करावा आणि करोनाविषयक अन्य नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केले आहे. दरम्यान, श्री महालक्ष्मी मंदिर न्यासातर्फे या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत मंदिराचे व्यवस्थापक शरदचंद्र पाध्ये यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.