मुंबई : भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या ‘महाकुंभ’ मेळ्याला उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये सुरुवात झाली असून देशातील विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. महाराष्ट्रातूनही प्रयागराजला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. महाकुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या ठिकाणी सोयी-सुविधांचा पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांवरही ताण येत आहे. त्यामुळे बहुतांश ट्रॅव्हल कंपन्यांकडून महाकुंभ मेळ्यासाठी विशेष पॅकेजचे नियोजन करण्यात आलेले नाही. मात्र, वैयक्तिकरीत्या प्रयागराजला जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्यामुळे ट्रॅव्हल कंपन्यांकडून छोट्या समूहाने जाणाऱ्यांना फक्त मार्गदर्शन केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याची छायाचित्रे व चित्रफिती समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर त्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. परिणामी, प्रवासाच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी ट्रॅव्हल कंपन्यांकडे नागरिकांची पावले वळत आहेत. मात्र सध्या प्रयागराजमध्ये हॉटेल, प्रशस्त तंबू आणि वाहतुकीशी संबंधित आरक्षण मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे ट्रॅव्हल कंपन्यांनी महाकुंभ मेळ्यासाठी विशेष पॅकेज करण्यापेक्षा वैयक्तिकरित्या प्रयागराजला जाणाऱ्या नागरिकांना विमान व रेल्वेचे तिकीट आरक्षित करून देणे, प्रयागराजमधील खासगी हॉटेल आणि प्रशस्त तंबू व्यावसायिकांशी संपर्क साधून देणे अशा पध्दतीने मार्गदर्शन करण्यावर भर दिला आहे. बोगस संकेतस्थळांपासून नागरिकांनी सावध राहावे आणि प्रवासाचे नियोजन करावे, असे देवम टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि ट्रॅव्हल एजन्सीज असोसिएशन ऑफ पुणे या संघटनेचे अध्यक्ष निलेश भन्साली यांनी सांगितले. ‘कॅप्टन निलेश हॉलिडेज’च्या निलेश गायकवाड यांनी प्रयागराजमधील वाढती गर्दी आणि अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे वैयक्तिकरीत्या जाणाऱ्यांसाठी मार्गदर्शकाची मर्यादित भूमिका ठेवली असल्याचे सांगितले.

हेही वाचा >>>रुग्णांसाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभारावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दरम्यान, श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा विशाल सोहळा असणाऱ्या ‘महाकुंभ’ मेळ्याला १३ जानेवारीपासून सुरुवात झाली असून २६ फेब्रुवारीला सांगता होणार आहे. प्रयागराजमध्ये उत्तरप्रदेश सरकारकडून विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या असून राहण्यासाठी तंबूही उभारण्यात आले आहेत. मात्र या व्यतिरिक्त खासगी कंपन्यांनी प्रसाधनगृहे, बेड, जेवण व नाश्ता आदी सर्व सोयीसुविधांनी युक्त प्रशस्त तंबू उभारले असून त्यांचा दर हजारो रुपयांच्या घरात आहे.

हेही वाचा >>>१७ अभ्यासक्रमासाठी मॉक टेस्ट, मॉक टेस्टसाठी भरावे लागणार ५०० रुपये

प्रयागराजमध्ये खासगी कंपन्यांच्या प्रशस्त तंबूंचे अंदाजे दर (तीन दिवसांसाठी)

प्रकार – शाही स्नान दिवस – शाही स्नान दिवसांव्यतिरिक्त 

लक्झरी कॉटेजेस – ३५ ते ४८ हजार – ३० ते ३८ हजार

डिलक्स कॉटेजेस – २५ ते ३० हजार – २० ते २५ हजार

प्रयागराजनंतर वाराणसी, अयोध्येला जाण्याकडे कल

महाकुंभ मेळ्यानिमित्ताने गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या संगमामध्ये स्नान केल्यानंतर नागरिकांची पावले उत्तर प्रदेशमधील वाराणसी व अयोध्येतील राम मंदिराकडे वळत आहेत. या अनुषंगाने काही ट्रॅव्हल कंपन्यांनी वाराणसी व अयोध्यावारीचे विशेष पॅकेज केले आहे. महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी नागरिकांची मागणी खूप आहे, मात्र त्या ठिकाणी गर्दी खूप वाढत असल्याने, काही रस्ते बंद आहेत. त्यामुळे महाकुंभ मेळ्याऐवजी आम्ही वाराणसी व अयोध्येचे विशेष पॅकेज केले आहे’ असे विहार ट्रॅव्हल्सचे संचालक दीपक पुजारी यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to the increasing crowd at the mahakumbh mela travel companies in maharashtra are providing guidance instead of planning mumbai print news amy