रेश्मा राईकवार
यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार असल्याने या दरम्यान सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी काम करणारे कला दिग्दर्शक, ध्वनी संयोजक, रंगभूषाकार, प्रकाश योजनाकार, गायक-गायिका अशा लाखो कलाकार-तंत्रज्ञांवरही उपासमारीची वेळ आली आहे.
अनेक कलाकार अर्थार्जनासाठी गणेशोत्सवावर अवलंबून असतात. मुंबईत अंधेरी पूर्वेला आणि पश्चिमेला मिळून १०० मोठी गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांचे मंडप सजावट, विद्युत रोषणाई, ध्वनियंत्रणा, देखावे अशा प्रत्येक विभागात काम करणारे तंत्रज्ञ असतात. ‘माझ्या हाताखाली किमान ५०० कलाकार काम करतात,’ अशी माहिती गणेशगल्लीच्या चिंतामणीपासून मोठय़ा मंडळांसाठी देखावे आरेखन करणाऱ्या कला दिग्दर्शक अमन विधाते यांनी दिली.
८ ते १० फुटाचे देखावे असतात. त्यासाठी कारागीर कोलकाता येथून येतात. ४० ते ५० हजार तंत्रज्ञ-कलाकार आणि असे बाहेरचे कारागीर मिळून लाखोंहून अधिक कामगार काम करत असतात. या सगळ्यांनाच गेले चार-पाच महिने कोणतेही काम नाही. आमच्यासारख्या स्वतंत्रपणे काम करणाऱ्या कलाकारांना इतके महिने कु ठलेच काम नसताना उदरनिर्वाह करणे जड जात आहे. आमची संघटित संस्था नसल्याने सरकारदरबारीही दाद मागता येत नाही, असे विधाते यांनी स्पष्ट के ले.
प्रकाश योजनाकोर म्हणून देश-परदेशातील कार्यक्रम, चित्रपट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी काम करणाऱ्या तेजस देवधरनेही कोम नसल्यामुळे परिस्थिती बिकट होत असल्याचे स्पष्ट केले.
गणेशोत्सवात तरी काम मिळेल अशी आशा होती; मात्र पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने आयोजित केलेल्या १० दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाचे काम वगळता अन्य काम नाही. त्यामुळे दिवे साहित्य, त्याची वाहतूक करणारे, इतर कामगार अशी साखळीच ठप्प झाल्याचे त्यांनी सांगितले.
कमीत कमी तंत्रज्ञ-कलाकारांच्या उपस्थितीत, पोलिसांच्या परवानगीने ऑनलाइन सांस्कृतिक कार्यक्रम झाले तर निदान काही जणांना काम मिळेल. मात्र छोटे-छोटे संगीत-नृत्यावर आधारित ऑनलाइन कार्यक्रम वगळता कुठेच काम नसल्याने उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न असल्याचे त्याने सांगितले.
गणेशोत्सवात विविध मंडळांमध्ये भेट देणाऱ्या कलाकारांचे व्हिडीओ, मुलाखत, सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्हिडीओ अशी अनेक कामे छाया दिग्दर्शक चेतन लोखंडे करतात. गेले चार-पाच महिने सगळेच ठप्प होते. आता हे निर्बंध गणेशोत्सवानंतरही कायम राहिले तर नवरात्रोत्सवातही काम मिळणार नाही. मोठय़ा स्तरावरील ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन झाले तर काही कामे मिळू शकतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
२००हून अधिक कलाकार-तंत्रज्ञांना संधी
पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टसाठी चित्रपट निर्माते पुनित बालन यांनी १० दिवसांच्या ऑनलाइन सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सध्या चित्रपटातील तंत्रज्ञांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांना काम मिळू शकेल, अशी शक्यता लक्षात आली. म्हणूनच तंत्रज्ञ आणि कलाकारांच्या मदतीने ऑनलाइन सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून यातून काहींना आर्थिक उत्पन्न मिळेल आणि लोकांपर्यंतही सांस्कृतिक कार्यक्रम पोहोचू शकतील, असे पुनित बालन यांनी सांगितले.