मुंबई : देशभर ट्रक आणि बसचालकांनी आंदोलन पुकारले असून इंधनाची वाहतूक आणि पुरवठा करणाऱ्या वाहनांवरील चालकही संपावर गेले आहेत. परिणामी, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी मंगळवारी सकाळपासून पेट्रोल पंपावर वाहनचालकांनी गर्दी केली आहे. ट्रक-बस चालकांच्या संपाचा फटका एसटीलाही बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. डिझेल अभावी एसटी बस सेवा बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणातील दोषींना १० वर्षांचा तुरुंगवास आणि सात लाख रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक आणि बसचालकांनी सोमवारपासून निदर्शने आंदोलन सुरू केले आहे. नववर्षाची सुरुवातच आंदोलनाने झाल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाणे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासह देशातील महत्त्वाच्या शहरात ट्रक आणि बस चालकांचे आंदोलन सुरू आहे. राज्यातही या आंदोलनाचा प्रभाव जाणवू लागला असून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. विदर्भात आंदोलन चिघळले असून विदर्भातील काही आगारांमधील एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच देशभरात शांततेत सुरू असलेले आंदोलन आता चिघळू लागले आहे.

हेही वाचा… ट्रक चालकांचं आंदोलन चालूच, इंधनपुरवठा सुरळीत होण्यासाठी राज्य सरकारचे पोलिसांना मध्यस्थी करण्याचे आदेश!

महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली लालपरी सर्वसामान्य प्रवाशांसाठी खूप जवळची आहे. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बहुसंख्य बसगाड्या डिझेलवर धावतात. दररोज एसटीच्या सरासरी १४ हजार बसेगाड्या धावतात. या बससाठी दररोज सरासरी ११ लाख लिटर डिझेल लागते. एसटीच्या बसना लागणाऱ्या डिझेलची पूर्तता न झाल्यास एसटीची सेवा खोळंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटीमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, एसटीच्या २५० आगारांत बसगाड्यांमध्ये डिझेल भरण्याची सुविधा आहे. इंडियन ऑइल कार्पोरेशन (आयओसी) व भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) या दोन कंपन्यांकडून एसटी महामंडळ डिझेल खरेदी करते. सर्व आगारांत मंगळवारी पुरेल इतका डिझेल साठा उपलब्ध आहे. संप आणखी काही दिवस सुरू राहिल्यास डिझेलची डिझेलचा तुटवडा निर्माण होईल आणि एसटी बसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागतील, अशी भिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to unavailability of diesel and fuel st bus services across states going to halt mumbai print news asj