मुंबई : मुंबईतील खालावलेला हवेचा दर्जा सुधारण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बोरिवली पूर्व व भायखळा येथील हवा अतिवाईट श्रेणीत गेल्यामुळे तेथील बांधकामे बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सोमवारी दिले होते. त्यानुसार, महापालिका प्रशासनातर्फे भायखळा आणि बोरिवलीतील ७८ बांधकामांना मंगळवारी काम थांबविण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या. यात बोरिवलीतील ४५, तर भायखळा परिसरातील ३३ बांधकाम ठिकाणांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालावला असून मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महानगरपालिका प्रशासनाने हवेचा दर्जा सुधारण्यासाठी विविध उपायोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा… जुन्या इमारतींतील रहिवाशांची पात्रता यादी संकेतस्थळावर दिसणार! दलालांचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी उपाय

बांधकाम प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी पुढाकार घेत २८ मुद्द्यांची सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. तसेच, प्रकल्प प्रवर्तक/इमारत विकासक आणि स्थापत्य प्रकल्प (यांत्रिकी व विद्याुत) कंत्राटदारांना पर्यावरण व्यवस्थापन योजना (ईएमपी) तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने गेल्या महिनाभरात मुंबईतील एकूण ८७७ बांधकाम प्रकल्पांची पाहणी केली. तसेच, २८ मुद्द्यांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी केली. मात्र, अनेक ठिकणी नियमांची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २८६ बांधकाम प्रकल्पांना महापालिकेने आतापर्यंत कारणे दाखवा आणि काम थांबविण्याची नोटीस बजावली.

दरम्यान, भायखळा आणि बोरिवली पूर्व भागातील हवा अतिवाईट श्रेणीत गेल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने भायखळा परिसरातील ३३ आणि बोरिवली पूर्व भागातील ४५ बांधकामांना मंगळवारी काम थांबविण्याची नोटीस बजावली. नोटीस बजवल्यानंतरही विकासकांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

हे ही वाचा… नववर्षाच्या क्षितिजावर विकासबिंब; बीकेसी-कुलाबा भुयारी मेट्रो प्रवास लवकरच

रस्त्यावर नव्याने चर खोदण्यास महापालिकेची मनाई

मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली विकासकामे, बांधकामे यासह हवेतील बदलामुळे वायू गुणवत्ता स्तर खालावल्याचे निदर्शनास आले आहे. वायुप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिकेने तातडीच्या, अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना लागू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेने रस्त्यावर चर खोदण्यासंदर्भात नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार, मुंबईत रस्त्यावर चर खोदण्यास मनाई करण्यात आली आहे. पाणी पुरवठ्याच्या मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम वगळता नवीन चर खोदण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. चर खोदण्याच्या कामामुळे वायुप्रदूषणात वाढ होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या कारणास्तव धूळ प्रतिबंध कार्यवाहीसाठी चर खोदकामास मनाई करण्याचे आदेश भूषण गगराणी यांनी सर्व प्रशासकीय विभागांचे सहाय्यक आयुक्त, रस्ते व वाहतूक विभागाचे उप प्रमुख अभियंता यांना दिले आहेत. ही मनाई पुढील आदेश येईपर्यंत लागू असेल.