आतापर्यंत केवळ डय़ुएल कोअर प्रोसेसर वापरण्यात आलेला मोबाइल फोन किंवा डय़ुएल सिम असलेला म्हणजेच दोन सिम कार्डे असलेला मोबाइल फोन लोकांना माहीत होता; पण आता येत्या महिन्यात भारतीय बाजारपेठेत डय़ुएल कोअर प्रोसेसर असलेले आणि डय़ुएल सिम कार्डाची सुविधा देणारे टॅब्लेट्स बाजारपेठेत येत आहेत. डय़ुएल सिम कार्डाची सुविधा देणारा पहिला टॅब्लेट गुरुवारी भारतीय बाजारपेठेत दाखल झाला!
सध्या बाजारपेठेत सिम कार्ड असलेल्या टॅब्लेट्सना ग्राहक सर्वाधिक प्राधान्य देताना दिसतात. अनेकांनी आता मोबाइलच्या ऐवजी थेट सिम कार्ड असलेला टॅब्लेट वापरण्यासच सुरुवात केली आहे. त्यामुळे मोबाइल आणि लॅपटॉप अशा दोन्ही गोष्टी सोबत न्याव्या लागत नाहीत. शिवाय कमी वजनाचा टॅब्लेट दोन्हीची गरज व्यवस्थित भागवत असल्याने ग्राहक खूश आहेत. मात्र एवढय़ावरच ही लाट अडकून राहिलेली नाही तर बाजारपेठेत डय़ुएल सिम असलेल्या टॅब्लेट्सची मागणी असल्याने अनेक कंपन्यांनी आता जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. डय़ुएल सिम सुविधेचा डय़ुएल कोअर प्रोसेसर असलेला टॅब्लेट भारतीय बाजारपेठेत कोणत्याही क्षणी दाखल होणार, अशी चर्चा गेले महिनाभर सुरू होती. गुरुवारी ‘स्वाइप’ने डय़ुएल सिम टॅब भारतीय बाजारपेठेत दाखल करून त्या चर्चेला पूर्णविराम दिला.
दरम्यान, इतरही अनेक कंपन्याही येत्या तीन महिन्यांत आपलेही डय़ुएल सिम टॅब्लेट्स बाजारात येत असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. नेमके कधी ते मात्र सांगण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली.  विशटेलचे सीईओ मिलिंद शहा यांनी सांगितले की, डय़ुएल सिमच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहेच. बाजारपेठेने हे उत्पादन स्वीकारल्याची ग्वाही पटली तर काही महिन्यांतच विशटेलचा डय़ुएल सिम टॅब्लेटही भारतीय बाजारपेठेत दिसेल.      
सुविधा युद्ध!
आयपॅडची उपयुक्तता लक्षात आल्यानंतर अनेकांनी टॅब्लेटच्या बाजारपेठेत उडी घेतली. त्यात संगणक व त्याच्याशी निगडित सहयोगी उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांबरोबरच मोबाइल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचाही समावेश होता. त्यामुळेच ‘एचपी’सह ‘आयबॉल’सारख्या कंपन्याही या बाजारपेठेत उतरल्या. सुरुवातीच्या कोणत्याच टॅब्लेट्सना सिम कार्डाची सोय या कंपन्यांनी दिलेली नव्हती. त्यानंतर मात्र ग्राहकांकडून मोठय़ा प्रमाणावर सिम कार्डाच्या टॅब्लेट्सची विचारणा होऊ लागल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत स्वाइप, विशटेल आणि पेंटा यांच्यासारख्या अनेक कंपन्यांनी सिम कार्ड असलेले टॅब्लेट्स बाजारपेठेत आणली.

Story img Loader