मुंबई : यंदाच्या लोकसत्ता दुर्गा ठरलेल्या विविध क्षेत्रांतील नऊ ‘दुर्गां’चा येत्या गुरुवारी ‘लोकसत्ता पुरस्कार २०२४’ देऊन सन्मान केला जाणार आहे. यावेळी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

गुरुवारी, २४ ऑक्टोबरला सायंकाळी ६.३० वाजता दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२४’ वितरण सोहळा रंगणार आहे. ‘लोकसत्ता दुर्गा’ उपक्रमाअंतर्गत दरवर्षी नवरात्रीनिमित्त विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या नऊ स्त्रियांचा गौरव केला जातो. या पुरस्काराचे हे अकरावे वर्ष आहे. यंदा या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये ‘स्त्रीमुक्ती संघटने’च्या अध्यक्षा ज्योती म्हापसेकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी आणि ‘मौज प्रकाशन गृह’च्या मुख्य संपादिका, सुप्रसिद्ध लेखिका मोनिका गजेंद्रगडकर यांचा समावेश होता.

हेही वाचा >>> maharashtra polls 2024 : भाजपच्या यादीनंतर बंडाचे वारे, महायुतीचा तिढा कायम असताना ९९ नावांची घोषणा

या वर्षीच्या लोकसत्ता दुर्गा पुरस्काराच्या ९ मानकरी आहेत. ८६ हजार वंचित, निराधार मुलांसाठी शिक्षणाची द्वारे खुली करून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या कोल्हापूरच्या अनुराधा भोसले, निवृत्तीनंतर ‘स्नेह ज्योती निवासी अंध विद्यालय’ उभारून दृष्टीहिन विद्यार्थ्यांना शिक्षणाची वाट दाखवणाऱ्या रत्नागिरीच्या ८३ वर्षीय आशा कामत, पैठणी साडीच्या निर्मितीपासून विपणनापर्यंतची माहिती देण्याचा अभ्यासक्रम तयार करणाऱ्या, तसेच आदिवासी, ऊस कामगारांच्या मुलांना रीतसर प्रशिक्षण देऊन त्यांना पैठणीनिर्मिती क्षेत्रात आणणाऱ्या येवला येथील अस्मिता गायकवाड, बालविवाह, माता-बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी गेल्या १८ वर्षांपासून रुग्णसेवा करणाऱ्या आरोग्य मित्र लातूरच्या कविता वाघे गोबाडे, स्वत: दोन्ही पायांनी अपंग असूनही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हिंगोली येथे सेवासदन वसतीगृह स्थापन करणाऱ्या मीरा कदम, ‘ग्रिप्स’ नाट्य चळवळीअंतर्गत मुलांसाठी नाटकांची निर्मिती आणि व्यवस्थापनाची धुरा सांभाळणाऱ्या पुण्याच्या शुभांगी दामले, सांगली जिल्ह्यातील दुष्काळी, डोंगराळ भागात राहणाऱ्या स्त्रिया आणि तरुणांसाठी गुणवत्तापूर्ण रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या स्नेहल लोंढे, कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधन करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या भंडारा जिल्ह्यातल्या डॉ. उषा डोंगरवार आणि अभियांत्रिकी शिक्षणानंतर लष्करी सेवेत रुजू होऊन देशसेवेसाठी कटिबद्ध असणाऱ्या अहमदनगर येथील मेजर सीता अशोक शेळके यांचा गुरुवारी ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२४’ देऊन गौरव केला जाणार आहे.

या सोहळ्यात मराठमोळ्या लोकसंस्कृतीच्या जागराचा सांस्कृतिक कार्यक्रमही सादर होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून काही जागा राखीव आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.