मुंबई : दसरा मेळाव्यासाठी दादर येथील शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी गेल्या वर्षी शिवसेनेच्या ठाकरे- शिंदे गटांमध्ये चांगलीच जुंपल्याने मुंबईत तणाव वाढला होता. त्यामुळे यंदा ठाकरे गटाने दीड महिना आधी परवानगीकरिता मुंबई महापालिकेला पत्र दिले आहे. ठाकरे गटाच्या पत्रानंतर शिंदे गटाने पत्र दिले असल्याचे समजते.
शिवसेनेतील फुटीनंतर गतवर्षी दसरा मेळाव्यावरुन ठाकरे व शिंदे गटात जुंपली होती. ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदान देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे ठाकरे गटाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागली. न्यायालयाने ठाकरे गटाला परवानगी दिल्याने शिंदे गटाला वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर मेळावा घ्यावा लागला. या वादाची पुनरावृत्ती यंदाही होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी ठाकरे गटाने पालिकेला पत्र दिले असून परवानगीच्या प्रतीक्षेत असल्याचे ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी सांगितले. तर, आम्ही शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी पत्र दिल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले.