मुंबई : विलेपार्ले पूर्व येथील बामनवाडा परिसरातील सहा मजली इमारतीचे पाडकाम करताना ठेकेदाराने धूळ प्रतिबंधक कोणत्याही उपाययोजना न करता यंत्राच्या सहाय्याने तोडकाम केल्याने या भागात धुळीचे लोट पसरत आहेत. परिसरातील रहिवासी, पादचारी, प्रवासी या धुळीने हैराण झाले आहेत.

बामनवाडा परिसरात देपश्री इमारतीच्या बाजूला असलेल्या सहा मजली इमारतीचे पाडकाम सध्या सुरू आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे परिसरातील हवेचा दर्जा खालावला आहे. सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी या प्रकरणी पोलिसात तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही तक्रार केली आहे. तोडकाम सुरू करण्यापूर्वी इमारतीच्या चारही बाजूला पत्रे, पाडकाम करण्यापूर्वी आाणि करताना इमारतीवर टँकरद्वारे पाण्याचे फवारे मारणे या अटींची पूर्तता केलेली नाही, असे पिमेंटा यांनी सांगितले. तसेच दिवसभर तोडकाम सुरू असल्यामुळे परिसरात वायुप्रदूषण होत असल्याचीही रहिवाशाची तक्रार आहे.

हेही वाचा >>>मुंबईत रेबीजमुळे कोल्ह्याचा मृत्यू

दरम्यान, गेले काही दिवस मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ झाली असून ते रोखण्यासाठी यापूर्वीच जारी करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे, प्रमाण कार्यपद्धतीचे बांधकाम आणि प्रदूषणाशी संबंधित सर्व सरकारी, तसेच खासगी संस्था, संघटना आदींनी काटेकोर पालन करावे, असे आदेश पालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. यानुसार सर्व प्रकल्पस्थळी ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पाभोवती किमान ३५ फूट उंच पत्र्याचे आच्छादन उभारणे अनिवार्य आहे. याशिवाय, बांधकामाधीन इमारतींना हिरव्या कापडाने पूर्णपणे झाकून बंदिस्त करणे बांधनकारक आहे.